India UAE Strategic Partnership 2026: पंतप्रधान मोदी अन् युएई अध्यक्षांमध्ये झाला फोनकॉल: नेमकी काय चर्चा झाली?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 55 m ago
पंतप्रधान मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान
पंतप्रधान मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान

 

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्यात दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींवर मते मांडली तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. युएई अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना ७६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पश्चिम आशियात शांतता आणि सुरक्षेवर भर

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. या भागात शांतता राखण्यासाठी परस्पर सहकार्य आणि समन्वय सुरू ठेवण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

'व्यापक धोरणात्मक भागीदारी'चा विस्तार

या संवादादरम्यान ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत-युएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पावलांवर चर्चा करण्यात आली. "युएईचे अध्यक्ष आणि माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्या फोन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांनी या संवादाची माहिती दिली.

ब्रिक्स परिषदेच्या यशाचे कौतुक

युएई अध्यक्षांनी भारताच्या यशस्वी 'ब्रिक्स' (BRICS) अध्यक्षतेबद्दल आणि परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत युएईचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद यांच्या सहभागाबद्दल आणि ब्रिक्स अंतर्गत ठोस परिणाम साध्य करण्यासाठी युएईने दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मनापासून आभार मानले.