पर्यावरण आणि हवामान बदलांवर NGT ची आंतरराष्ट्रीय परिषद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली 

पर्यावरण आणि हवामान बदलांच्या जागतिक आव्हानांवर मंथन करण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) आयोजित केलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि १७ देशांचे न्यायालयीन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

"द फ्युचर ऑफ एन्व्हायरन्मेंट अँड क्लायमेट डायनॅमिक्स" या विषयावर या वीकेंडला या विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायव्यवस्थेची देवाणघेवाण

शासकीय निवेदनानुसार, या परिषदेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव, राज्य न्यायालयीन अकादमींचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जगातील १७ देशांतील नामवंत न्यायमूर्ती आणि न्यायालयीन प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

ही परिषद विविध अधिकारक्षेत्रांमधील न्यायालयीन दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरण प्रशासकीय पद्धती आणि संस्थात्मक अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी एक भक्कम व्यासपीठ ठरेल.

धोरणात्मक त्रुटींवर होणार मंथन

पर्यावरण आणि हवामान बदलांसंदर्भातील गंभीर आव्हाने, धोरण निर्मितीतील त्रुटी, अंमलबजावणीतील अडचणी आणि कायदेशीर चौकटीची पडताळणी यावर परिषदेत सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच पर्यावरण प्रशासन मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय संस्थात्मक सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांचा या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे.