पाकिस्तानात मस्जिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट; १६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मस्जिदीत शुक्रवारी  भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट
वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मस्जिदीत शुक्रवारी भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट

 

पेशावर

वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी नमाजाच्या वेळी एका मस्जिदीत भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

खैबर पख्तुनख्वा राजधानी पेशावरपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोहाटमधील जुन्या पोलीस लाईन्सजवळ ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी थेट  मस्जिदीच्या आवारात घुसली आणि स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला.

मस्जिदीचे छत कोसळले अन् दुसरा स्फोट

प्रांतीय पोलीस प्रमुख जुल्फिकार हमीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका तीव्र होता की मस्जिदीचे छत पूर्णपणे कोसळले आणि बाहेर मोठा खड्डा पडला. गोळीबारादरम्यान स्पेशल ब्राँचच्या इमारतीजवळ आणखी एक आत्मघाती स्फोट झाला. बहुतांश जखमी हे मस्जिदीत नमाज अदा करणारे नागरिक होते. 'इत्तेहाद-उल-मुजाहिद्दीन पाकिस्तान' या नव्याने स्थापन झालेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जखमींवर उपचार आणि प्रशासनाची प्रतिक्रिया

रेस्क्यू ११२२ च्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, देशाच्या सुरक्षेसाठी परकीय पाठबळ असलेल्या दहशतवाद्यांचा संपूर्ण नायनाट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे.