नवी दिल्ली
बांगलादेशी महिलांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका मोठ्या मानवी तस्करी (Human Trafficking) टोळीला हैदराबाद येथील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ८ बांगलादेशी नागरिकांसह एकूण ९ आरोपींना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष न्यायालयाने सर्व दोषींवर प्रत्येकी १.३७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या साध्या कैदेची तरतूद केली आहे. दोषींमध्ये आठ बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून महिलांना चांगल्या वेतनाच्या नोकऱ्यांचे प्रलोभन देऊन बेकायदेशीरपणे भारतात आणले जात असे आणि नंतर हैदराबादमध्ये त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जात होते.
हे प्रकरण सर्वप्रथम सप्टेंबर २०१९ मध्ये समोर आले होते, जेव्हा तेलंगणा पोलिसांनी हैदराबादजवळील जलपल्ली आणि बालापूर परिसरात धाड टाकून ४ बांगलादेशी महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली होती. तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) १२ ऑक्टोबर २०१९ रोजी या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आपल्या हाती घेतला.
एनआयएने २०१९ आणि २०२० दरम्यान पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह विविध ठिकाणांवरून सर्व आरोपींना अटक केली होती. रुहुल अमीन धाली, मोहम्मद युसूफ खान, बिथी बेगम, इमामुल गाझी, मोहम्मद अल मामून, सोजीब शेख, सुरेश कुमार दास, मोहम्मद अब्दुल्ला मुन्शी आणि मोहम्मद अयुब शेख अशी दोषींची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय दंड संहिता (IPC), परदेशी नागरिक कायदा (Foreigners Act) आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटला चालवून कडक शिक्षा सुनावण्यात आली आहे.