Ayodhya Ram Temple Theft: आरोपींना जामीन नाही; न्यायालयाचे केस डायरी सादर करण्याचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 58 m ago
राम मंदिर आणि चंपत राय
राम मंदिर आणि चंपत राय

 

अयोध्या

अयोध्येतील भव्य राम मंदिरात भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत २१ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अयोध्येतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश रजत वर्मा यांनी शुक्रवारी हा आदेश दिला असून, पुढील सुनावणीदरम्यान प्रकरणाची 'केस डायरी' आणि तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याचे कडक निर्देश पोलिसांना दिले आहेत.

७९ लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त

या प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर २५ जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राम मंदिरातील दानमोजणी प्रक्रियेशी जोडलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी आरोपींकडून आतापर्यंत ७९.८५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

बँक कर्मचारी आणि मुख्य प्रभारी आरोपींच्या यादीत

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनिष कुमार यादव, करूणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर उर्फ टिन्नू यादव यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश आरोपी मंदिरातील रोकड मोजण्यासाठी नियुक्त केलेले बँक कर्मचारी आहेत. सुभाष श्रीवास्तव हा दानमोजणी प्रक्रियेचा मुख्य प्रभारी होता, तर टिन्नू यादव चालक म्हणून काम करत होता.

जामीन अर्जावर २१ सप्टेंबरला सुनावणी

आरोपींचे वकील कुल शेखर सिंग यांनी सांगितले की, तपास अधिकाऱ्याने न्यायालयात तपास अहवाल सादर न केल्यामुळे जामीन अर्जावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. आगामी सुनावणीत पोलिसांनी केस डायरी सादर केली नाही, तर जामिनासाठी विशेष अर्ज केला जाईल. दरम्यान, मुख्य आरोपी सुभाष श्रीवास्तव याने आपल्या जामीन अर्जात आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचा दावा केला असून, दानमोजणी प्रक्रियेत इतरही अनेक व्यक्तींचा सहभाग होता असे न्यायालयात स्पष्ट केले आहे.