Asian Games Women's Cricket: भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक; जपानचा ५७ धावांत धुव्वा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
भारताकडून जपानचा एकतर्फी पराभव
भारताकडून जपानचा एकतर्फी पराभव

 

निशिन (जपान)

डावखुरी फिरकीपटू श्री चरणीची (४/१०) घातक गोलंदाजी आणि सलामीवीर शफाली वर्माच्या (४० नाबाद, २/१३) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सुवर्णपदक विजेत्या भारताने जपानचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. आता २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या जपानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ५७ धावांत रोखले. या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या ५ षटकांत २ गडी गमावून ५९ धावा करत शानदार विजय नोंदवला.

श्री चरणी आणि शफालीची फिरकीची जादू

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जपानच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीपासूनच हात उघडण्याची संधी दिली नाही. डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने ७ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर हरुना इवासाकी (१०) आणि कर्णधार माई यानागिडा यांना बाद करत जपानला मोठे धक्का दिले. चरणीने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत ४ गडी बाद केले, ही तिची टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दुसऱ्या बाजूने शफाली वर्मानेही उत्तम फिरकी गोलंदाजी करत २४ धावा करणाऱ्या आयाका काटो-स्टाफर्ड आणि शिमाको काटो यांना तंबूत धाडले. भारतीय फिरकीच्या जोरावर जपानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत ५७ धावांवर गारद झाला.

शफाली वर्माचे १५ चेंडूंत वादळी ४० रन

५८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली. तिने १५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा ठोकल्या. गुणाकलन कमलिनी आणि भारती फुलमाली लवकर बाद झाल्यानंतर शफालीने रिचा घोषच्या (१२ नाबाद) सोबतीने अवघ्या ५ षटकांत विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेने उपांत्यपूर्व सामन्यात मलेशियाचा ८६ धावांनी पराभव केला होता.