मोकी
चीनमधील मोकी येथे सुरू असलेल्या ज्युनियर पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करत मलेशियन संघाचा ३-१ असा पराभव केला आहे. या विजयासोबतच भारतीय युवा संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Final) दिमाखात धडक मारली आहे. भारताच्या सलग चौथ्या अंतिम फेरीच्या प्रवेशात कर्णधार आणि ड्रॅग-फ्लिकर अनमोल एक्काची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या सत्रात मलेशियाने जोरदार प्रयत्न केले, पण भारताची बचावफळी मजबूत राहिली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला १६ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार अनमोल एक्काने अचूक आणि वेगवान फटका मारत भारताचे खाते उघडले आणि १-० अशी आघाडी मिळवून दिली.
मलेशियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताचा गोलरक्षक विवेक लाक्रा याने काही अप्रतिम बचावात्मक कामगिरी करत मलेशियाचे मनसुबे उधळून लावले. तिसऱ्या सत्रात भारताला काही पिवळी कार्डे (yellow cards) मिळाल्यामुळे खेळाडूंना १० जणां खेळावे लागले, तरीही बचाव मजबूत राहिला. चौथ्या सत्रात सुखविंदरने ५१ व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी २-० केली.
यानंतर मलेशियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, पण गोलरक्षक विवेक लाक्राने डावीकडे झेप घेत तो उत्कृष्टपणे अडवला. अवघ्या एका मिनिटानंतर भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अनमोल एक्काने पुन्हा एकदा शानदार गोल करत आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. सामन्याच्या शेवटच्या सेकंदात मलेशियाकडून एम. राहुूलने एक गोल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या विजयासह भारताने ३-1 च्या फरकाने सामना जिंकून फायनलचे तिकीट कन्फर्म केले. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तान किंवा दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.