नवी दिल्ली
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) नेस्ले इंडिया लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लहान मुलांच्या तीन प्रमुख आहार उत्पादनांमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या उत्पादनांच्या जाहिराती आणि माहितीची पाहणी केल्यानंतर प्राधिकरणाने हे मोठे पाऊल उचलले आहे.
एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, नेस्लेच्या 'नॅन एक्सेल प्रो स्टेज १' (NAN Excella Pro Stage 1), 'लॅक्टोजन प्रो १' (Lactogen Pro 1) आणि एका फॉलो-अप फॉर्म्युला प्रॉडक्टची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान उत्पादनांचे दावे आणि जाहिरातींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.
'नॅन एक्सेल प्रो स्टेज १' मध्ये ५एचएमओ (5HMOs) आणि व्हे प्रोटीन (Whey Protein) बाबत केलेले दावे, तर 'लॅक्टोजन प्रो १' मध्ये व्हे प्रोटीन पचनास सोपे असल्याचे केलेले दावे एफएसएसएआयने निदर्शनास आणले आहेत. या दाव्यांबाबत प्राधिकरणाने नेस्ले इंडियाकडून स्पष्टीकरण मागवले होते.
तपासाअंती दोन्ही उत्पादने 'अन्न सुरक्षा आणि मानके (शिशू आहारासाठी अन्न) नियम २०२०' च्या नियम ४(२) चे उल्लंघन करत असल्याचे निष्पन्न झाले. हे नियम शिशू आहाराची विक्री वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यावसायिक दाव्यांवर बंदी घालतात. तसेच 'शिशू दुधाचे पर्याय, फीडिंग बॉटल्स आणि शिशू अन्न अधिनियम १९९२' च्या कलम ३ चेही यात उल्लंघन झाले आहे, जे अशा उत्पादनांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालते.
दुसऱ्या एका प्रकरणात, नेस्ले इंडियाच्या फॉलो-अप फॉर्म्युलाच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यातील 'बायोटिन' (Biotin) या घटकाचे प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले. या नमुन्याची पुनर्तपासणी केली असता, त्यातही २०२० च्या नियमांनुसार आवश्यक असलेले बायोटिनचे प्रमाण नसल्याचे स्पष्ट झाले.
या तिन्ही उत्पादनांमधील त्रुटी आणि नियमांच्या उल्लंघनामुळे एफएसएसएआयने नेस्ले इंडियाविरोधात तीन स्वतंत्र खटले दाखल केले आहेत. या कारवाईची माहिती समोर आल्यानंतर मुंबई शेअर बाजारात (BSE) नेस्ले इंडियाचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी घसरून १,३४५.४५ रुपयांवर आले.