महफूज आलम, पाटणा
भारतीय उपखंडातल्या खानकाह अनेक शतकांपासून आध्यात्मिक प्रशिक्षण, नैतिक सुधारणा आणि सामाजिक सलोख्याची मुख्य केंद्रं राहिल्या आहेत. त्यांनी मानवतेचा संदेश, मानवी सेवा, बंधुभाव आणि सहिष्णुता यांचा मोठा प्रसार केला. समाजाला भक्कम बनवण्यात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकविसाव्या शतकाच्या बदलत्या परिस्थितीत या खानकाह आपल्या आध्यात्मिक परंपरांचं जतन करत आहेत. त्याच वेळी त्या शिक्षण, कौशल्य विकास, नेतृत्व प्रशिक्षण आणि राष्ट्राच्या प्रगतीच्या क्षेत्रात अधिक सक्रिय भूमिका बजावत आहेत.
आज मुस्लिम समाजासमोर गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक कौशल्यं, रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आणि राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व ही सर्वात मोठी आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत खानकाहांनी आपली सेवा आध्यात्मिक सुधारणेपुरती मर्यादित ठेवली, तर अवघड होईल. तरुण पिढीला आधुनिक शिक्षण, वैज्ञानिक विचार, संशोधन, नेतृत्वाचे गुण आणि राष्ट्रीय जबाबदारीच्या भावनेने समृद्ध करणं, ही आजच्या काळाची गरज आहे.
या बाबतीत बिहारमधलं 'खानकाह रहमानी मुंगेर' उल्लेखनीय उदाहरण म्हणून समोर येतं. धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला या संस्थेने अतिशय पद्धतशीर प्रयत्न केलेत. हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना देशातल्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सन्मानाचं स्थान मिळवून देणं, हे मोठं काम त्यांनी केलंय. योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट कोचिंग आणि पुरेशी साधनं उपलब्ध करून दिली, तर वंचित पार्श्वभूमीतले विद्यार्थी आयआयटी, एनआयटी, वैद्यकीय महाविद्यालयं, चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इतर प्रतिष्ठित क्षेत्रांमध्ये प्रचंड यश मिळवू शकतात, हे 'रहमानी ३०' सारख्या उपक्रमांनी दाखवून दिलंय. आज खानकाह रहमानीचं काम मुंगेरपासून पाटण्यापर्यंत पसरलंय. ते आपला आध्यात्मिक मार्गदर्शनाचा, शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणेचा महान वारसा वेगाने पुढे नेत आहेत.

मोठ्या स्वप्नाची पूर्ती: मौलाना मोहम्मद अली मुंगेरी
खानकाह रहमानीची स्थापना १९०१ मध्ये प्रख्यात विद्वान, सुधारक, विचारवंत आणि दारुल उलूम नदवातुल उलामाच्या संस्थापकांपैकी असलेले हजरत मौलाना मोहम्मद अली मुंगेरी यांनी केली. त्यांनी मुंगेरला आपल्या शैक्षणिक आणि सुधारणावादी उपक्रमांचं मुख्य केंद्र बनवलं. लोकांच्या धार्मिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी समर्पित असलेल्या चळवळीचा पाया त्यांनी रचला. त्याचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतरही तितकाच जाणवतो.
मौलाना मोहम्मद अली मुंगेरी हे दूरदृष्टी असलेल्या विद्वानांपैकी होते. त्यांनी सामाजिक सुधारणा शिक्षण, चारित्र्य घडवणूक आणि बौद्धिक जागृतीशी जोडली. त्यांनी जातीय वादविवाद, अनावश्यक मतभेद आणि सैद्धांतिक संघर्षांना नेहमीच विरोध केला. त्याच वेळी मुस्लिमांमधली एकता, संयम आणि परस्पर सलोख्यावर त्यांनी भर दिला.
धार्मिक ज्ञानासोबतच आधुनिक ज्ञानाची ओळख असणं समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, ही गोष्ट त्यांनी खूप आधी ओळखली होती. म्हणूनच इंग्रजी शिक्षणाला मोठा विरोध होत असतानाच्या काळात त्यांनी विलक्षण दूरदृष्टी दाखवून त्याला पाठिंबा दिला. काळाच्या बदलत्या गरजांनुसार मुस्लिमांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हीच व्यापक दूरदृष्टी पुढे खानकाह रहमानीच्या शैक्षणिक आणि सुधारणावादी परंपरेचा पाया बनली.
.jpg)
मौलाना मिन्नातुल्ला रहमानी यांचं सुवर्णयुग
हजरत मौलाना मोहम्मद अली मुंगेरी यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र हजरत मौलाना मिन्नातुल्ला रहमानी खानकाह रहमानीचे सज्जादा नशीन बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली खानकाहने शिक्षण, धर्म आणि समाजसेवेच्या क्षेत्रात असाधारण प्रगती केली. त्यांचा हा कार्यकाळ या संस्थेच्या इतिहासातला सुवर्ण अध्याय ठरला.
त्यांनी कायमस्वरूपी शैक्षणिक वर्ग सुरू केले. त्यांनी अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती अधिक भक्कम केली. धार्मिक शिक्षणासोबतच नैतिक प्रशिक्षण आणि चारित्र्य घडवणुकीला मध्यवर्ती स्थान देणारं उत्तम वातावरण निर्माण केलं. यातूनच त्यांनी जामिया रहमानीला सुव्यवस्थित शैक्षणिक संस्थेचं रूप दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जामिया रहमानीची ओळख देशातली प्रतिष्ठित इस्लामिक संस्था म्हणून जगभरात निर्माण झाली.
सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदानही तितकंच उल्लेखनीय होतं. धार्मिक जाणीव निर्माण करायला त्यांनी मुंगेर आणि आसपासच्या भागात विविध सुधारणावादी उपक्रम सुरू केले. रमजानच्या महिन्यात जामिया रहमानीतले हुफ्फाज (कुराण मुखोद्गत असलेले विद्वान) वेगवेगळ्या मशिदींमध्ये तरावीहच्या प्रार्थनांचं नेतृत्व करण्यासाठी नियमितपणे पाठवले जात असत. यामुळे कुराण पठणाची परंपरा मजबूत झाली आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रदेशात धार्मिक जाणीव आणि आध्यात्मिक ओढ सखोल झाली.

मौलाना मोहम्मद वली रहमानी आणि आधुनिक उपक्रम
१९९१ मध्ये हजरत मौलाना मिन्नातुल्ला रहमानी यांच्या निधनानंतर हजरत मौलाना मोहम्मद वली रहमानी सज्जादा नशीन झाले. त्यांनी आपल्या वडिलांचं शैक्षणिक आणि सुधारणावादी कार्य पुढे नेलं. शिवाय आधुनिक काळाच्या गरजांनुसार त्याचा खूप मोठा विस्तारही केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, समाजकल्याण, जनसेवा आणि बौद्धिक जागृतीच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले. त्याचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. विद्यार्थ्यांचं यश केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेपुरतं मर्यादित राहू नये, असा मौलाना मोहम्मद वली रहमानी यांचा ठाम विश्वास होता. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य आणि समाजाची सेवा करण्याची बांधिलकी असलेलं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःला घडवलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. या विचाराने प्रेरित होऊन जामिया रहमानीने सुलेखन, वाचनाची सवय, नेतृत्व विकास, सार्वजनिक भाषण, लेखन कौशल्य आणि समकालीन मुद्द्यांची जाणीव या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षण पद्धतीत समावेश केला.

सध्याचं नेतृत्व आणि शैक्षणिक दृष्टिकोन
प्रख्यात इस्लामिक विद्वान, विचारवंत आणि खानकाह रहमानीचे सज्जादा नशीन हजरत मौलाना मोहम्मद वली रहमानी यांचं २०२१ मध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मौलाना अहमद वली फैसल रहमानी यांनी सज्जादा नशिनीची मोठी जबाबदारी स्वीकारली.
१२ मे १९७५ रोजी जन्मलेल्या मौलाना अहमद वली फैसल रहमानी यांनी आपलं सुरुवातीचं धार्मिक आणि आधुनिक शिक्षण आपल्या कुटुंबातल्या आदरणीय विद्वान आणि आध्यात्मिक ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं. त्यांच्याकडूनच त्यांना अभ्यासपूर्ण दृष्टी, धार्मिक दृष्टिकोन आणि नेतृत्वाची मोठी परंपरा वारशाने मिळाली.
खानकाहची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तिच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि अभ्यासपूर्ण उपक्रमांचा अधिक विस्तार करायला पावलं उचलली. त्यांच्या मते श्रद्धेचं जतन केल्यानंतर मुस्लिमांची सर्वात मोठी गरज म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणं ही आहे. शिक्षण हीच मुख्य ताकद आहे. ती व्यक्ती आणि राष्ट्रांना प्रगती, आत्मविश्वास आणि सन्मानजनक भविष्य मिळवून देते, यावर त्यांनी अनेक प्रसंगी भर दिलाय. याच दृष्टिकोनाला अनुसरून तरुण पिढीमध्ये शैक्षणिक जागरूकता, बौद्धिक स्थिरता आणि चारित्र्य घडवणूक या गोष्टींना विशेष प्राधान्य दिलं जातंय.
.jpg)
२००३ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मुंगेर इथल्या खानकाह रहमानीला भेट दिली होती. ही गोष्ट उल्लेखनीय आहे. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी इथलं आध्यात्मिक वातावरण, शैक्षणिक उपक्रम आणि समाजसेवेची जवळून पाहणी केली. संस्थेच्या या सर्व प्रयत्नांचं त्यांनी मनापासून कौतुक केलं होतं.
रहमानीच्या प्रमुख संस्था

यशाची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी
'सुपर ३०' च्या संकल्पनेवर आधारित असलेलं 'रहमानी ३०' आज शेकडो विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग पुरवतं. ही संस्था आयआयटी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेते. त्यासोबतच एनआयटी, चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोचिंग देते. दरवर्षी इथले मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश मिळवतात.
रहमानी ३० सध्या पाटणा, हैदराबाद, बेंगळुरू, महाराष्ट्र आणि औरंगाबाद इथे आपलं काम चालवतं. या कार्यक्रमाचे प्रमुख सध्या मौलाना मोहम्मद वली रहमानी यांचे सुपुत्र फहाद रहमानी हे आहेत. ते या संस्थेचे सीईओ म्हणून जबाबदारी पाहताहेत.
फहाद रहमानी यांच्या मते ही संस्था समाजात नेतृत्व निर्माण करायला पूर्णपणे कटिबद्ध आहे. येत्या काही वर्षांत या मोहिमेला अधिक वेग देण्याचा त्यांचा मानस आहे. भारतातल्या सर्व राज्यांमध्ये रहमानी ३० ची केंद्रं स्थापन करण्याची या संघटनेची योजना आहे. या दिशेने काम आधीच सुरू झालंय. संस्थेला मिळालेल्या सततच्या यशाने उत्साहित होऊन अधिक संख्येने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी ते सर्व शक्य प्रयत्न करताहेत.

समाजात नेतृत्व निर्माण करणं हेच संस्थेचं मुख्य ध्येय
शैक्षणिक कार्यक्रमाची देखरेख करणारे फहाद रहमानी सांगतात, “भारतात आयआयटीच्या सुमारे एक लाख जागा आहेत. त्यावर सरकार खूप मोठी साधनसामग्री आणि खर्च करतं. या सुमारे एक लाख जागांपैकी मुस्लिमांकडे जास्तीत जास्त २,००० जागा जातात. ही संख्या १५,००० हून अधिक असायला हवी”, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
“आयआयटी जागतिक दर्जाचं नेतृत्व तयार करणारी व्यवस्था आहे”, असं ते पुढे सांगतात. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर अनेक आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ अशाच संस्थांमधून पुढे आलेत. म्हणूनच मुस्लिम विद्यार्थ्यांना या व्यवस्थेशी जोडणं हे त्यांच्या मुख्य उद्दिष्टांपैकी आहे.
“अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने रहमानी ३० चे निकाल खूप उत्साहवर्धक आलेत. येत्या काळात अधिक संख्येने विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित संस्थांपर्यंत पोहोचायला आणि त्यांची स्वप्नं पूर्ण करायला आपण मदत करू शकू”, अशी आशा ते व्यक्त करतात.
खानकाह रहमानीचा प्रेरणादायी प्रवास: शतकाहून अधिक काळाचा वारसा