१९६८ मध्ये एका मुस्लिम व्यक्तीने सुरु केलेलं गणेशमंडळ…

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
सोलापूरच्या पिलिव गावातील ‘संग्राम दोस्ती मंडळ’
सोलापूरच्या पिलिव गावातील ‘संग्राम दोस्ती मंडळ’

 

भक्ती चाळक

तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात एका मुस्लीम व्यक्तीने चक्क गणेश मंडळाची स्थापना केली होती. एवढेच नाही, तर ५६ वर्षांनंतर आजही हेच मंडळ संपूर्ण गावाला एकत्र आणून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलिव या गावातली ही गोष्ट. इथे असलेले ‘संग्राम दोस्ती मंडळ’ हे सामाजिक सौहार्दाची एक जिवंत मिसाल आहे. या मंडळाची सुरुवात जितकी थक्क करणारी आहे, तितकाच त्याचा आजवरचा प्रवासही प्रेरणादायी आहे. ‘आवाझ-द-व्हॉईस’शी बोलताना या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अनोख्या परंपरेचा सुरेख पट उलगडून दाखवला.

१९६८ मध्ये लावलेले सलोख्याचे रोपटे
पिलिव गावातील गणेशोत्सवाचा इतिहास पाहिला, तर या मंडळाची स्थापना १९६८ मध्ये झाली. गावातील पहिले गणेश मंडळ म्हणून या संग्राम दोस्ती मंडळाकडे पाहिले जाते.

याकूब गणी सय्यद यांनी गावात सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी या मंडळाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू सय्यद गुरुजी हेसुद्धा या कार्यात हिरीरीने सहभागी झाले होते. गावात हिंदू-मुस्लीम समाजाने गुण्यागोविंदाने राहावे, आपापसातील मतभेद मिटून सलोखा वाढीस लागावा, हाच याकूब सय्यद यांचा मुख्य उद्देश होता.
 

आजोबांचा वारसा नातवाने जपला
काळाच्या ओघात मंडळाचे संस्थापक याकूब सय्यद आणि त्यांचे बंधू सय्यद गुरुजी या दोघांचेही निधन झाले. पण त्यांनी सुरू केलेली ही सामाजिक ऐक्याची परंपरा थांबली नाही. त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि संपूर्ण गावाने हा वारसा पुढे सुरु ठेवला आहे.

याकूब सय्यद यांचे नातू जीशान अल्लाउद्दीन शेख आज या मंडळात खजीनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या आजोबांच्या आठवणी आणि या परंपरेबद्दल सांगताना जीशान म्हणतात, “आमच्या आजोबांनी गावातील ऐक्यासाठी या मंडळाची स्थापना केली होती. सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन उत्सव साजरा करण्याचा हा वारसा आम्ही आजही पुढे नेतोय.”

प्रत्येक व्यक्तीला समान स्थान
या मंडळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे पदांची किंवा कामांची विभागणी कोणाचाही जात-धर्म बघून केली जात नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार अशी सर्व पदे गावातील विविध घटकांमध्ये वाटून दिली जातात.

सध्या या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा योगेश सुतार सांभाळत आहेत, तर उपाध्यक्षपदी राजपूत समाजातील राहुल जामदार कार्यरत आहेत. मंडळाच्या खजिनदारपदाची जबाबदारी जीशान शेख यांच्याकडे आहे.

मंडळातील रचनेबद्दल माहिती देताना जीशान आवर्जून सांगतात की, “आमच्या मंडळात कोळी, सुतार, राजपूत, मुस्लीम, मातंग आणि महार अशा सर्व समाजाचे कार्यकर्ते एकत्र आहेत. प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तीला इथे योग्य मान-सन्मान दिला जातो.”

इतकेच नाही, तर या मंडळात जवळजवळ ६० टक्के कार्यकर्ते मुस्लीम समाजाचे आहेत. सर्व सण-उत्सव सगळे एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात.

 
देखाव्यांतून सामाजिक संदेश 
उत्सवात केवळ मज्जा-मस्ती न करता समाजाला काहीतरी विचार देण्याचा प्रयत्न या मंडळाकडून नेहमी होतो. मंडळाचे देखावे आणि सजावटीची जबाबदारी कदीर पठाण हे सांभाळतात. देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव कसा जपता येईल, यावर त्यांचा भर असतो.

मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत लोखंडे या वातावरणाविषयी सांगताना म्हणतात, “आमचे मंडळ एकाच धर्माचे नसून सर्वधर्माचे आहे. सगळेजण एकमेकांचे स्वभाव समजून घेतात आणि काहीही वाद न घालता एकत्र राहतात.”

आजकाल गणेशोत्सवात कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा वापर वाढला आहे. परंतु संग्राम दोस्ती मंडळाने याला पूर्णपणे फाटा दिला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल शशिकांत लोखंडे पुढे सांगतात, “कानाला त्रास देणाऱ्या डीजे ऐवजी शांततेत मिरवणूक काढण्यावर आमचा भर असतो. गावात कोणतीही धार्मिक तेढ निर्माण न होता सर्वधर्मांनी एकत्र उत्सव साजरा करावा, ही आमची इच्छा आहे.”

गणेश भक्तीसोबत श्रेष्ठदानाचाही संकल्प 
 
 
धार्मिक सलोख्यासोबतच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात हे मंडळ नेहमी पुढे असते. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात हे मंडळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करते. रक्तदानामुळे गरजवंतांचे प्राण वाचू शकतात आणि रक्ताच्या माध्यमातून माणसाला माणसाशी जोडता येते, या विचाराने कार्यकर्ते या उपक्रमात हिरीरीने भाग घेतात. मुस्लिमही मोठ्या संख्येने सहभागी होतात. 

सांगोला ब्लड सेंटरच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात पार पडलेल्या शिबिराबद्दल सांगताना जीशान शेख म्हणाले, “यंदाच्या रक्तदान शिबिरात आम्ही १११ रक्ताच्या बॅग्स जमा करून रक्तपेढीला दिल्या. गावातील सर्व मान्यवरांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सामाजिक कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.”

याकूब सय्यद यांनी ५६ वर्षांपूर्वी लावलेले हे सलोख्याचे छोटेसे रोपटे आज एका घटवृक्षासारखे संपूर्ण गावाला आपल्या सावलीत एकत्र धरून आहे. पिलिवप्रमाणेच संपूर्ण राज्य काय तर देशातही हा सौहार्द टिकून राहावा, ही इच्छा गावकऱ्यांनी व्यक्ती केली. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter