अर्सला खान
काही आठवणी काळाच्या ओघात कधीच पुसल्या जात नाहीत. त्या छातीत वेदना बनून कायमच्या घर करून राहतात. रुपेरी पडद्यावर आपल्या भन्नाट टायमिंगने करोडो चेहऱ्यांवर हसू फुलवणाऱ्या अरशद वारसीच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागेसुद्धा एक भयंकर वेदना दडलेली आहे. एक असा पश्चात्ताप, जो रात्रीच्या शांततेत त्याला आजही सुखाने झोपू देत नाही.
कोणत्याही मुलाखतीत जेव्हा अरशदच्या आईचा विषय निघतो, तेव्हा क्षणात त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यांत दुःखाची छाया उमटते. तो अचानक शांत होतो, शब्द ओठांवरच अडकून पडतात. त्या क्षणी तो एक मोठा स्टार राहत नाही, तर आजसुद्धा स्वतःला आईचा गुन्हेगार मानणारा तोच लहान, हतबल मुलगा बनून जातो.
गरिबी अन् आजारपणाचा दुहेरी घाला
अरशदचे बालपण इतर मुलांसारखे हसतखेळत गेले नाही. अतिशय लहान वयातच आयुष्याने त्याच्यासमोर अडचणींचा असा डोंगर उभा केला, जिथून सावरणे कठीण होते. घराची आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की, रोजच्या गरजा भागवणे कठीण झाले होते.
याच हलाखीच्या परिस्थितीत अरशदची आई गंभीर आजारी पडली. घरात उपचारासाठी पैसे नव्हते अन् औषधांसाठीसुद्धा नव्हते. आजारपण हळूहळू वाढत गेले. एक दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
ती शेवटची रात्र
रुग्णालयातील त्या खोलीत पांढऱ्या चादरीवर पडलेली आई आयुष्य आणि मृत्यू यांच्याशी झुंज देत होती. नसांमधून सलाईनद्वारे औषधे दिली जात होती. डॉक्टरांनी अत्यंत सक्त ताकीद दिली होती की, रुग्णाला पाण्याचा एक थेंबसुद्धा द्यायचा नाही.
रात्र गडद होत होती. उशाशी बसलेला लहानगा अरशद आईचा हात धरून जागा होता. तेवढ्यात आईने सुकलेले ओठ हलवत अत्यंत क्षीण आवाजात हाक मारली. बाळा, थोडे पाणी पाज ना.
अरशदच्या कानात डॉक्टरांची ती सक्त ताकीद पुन्हा पुन्हा घुमू लागली. त्याने मनावर दगड ठेवला अन् पाण्यास नकार दिला. आई वारंवार पाणी मागत राहिली. तिच्या डोळ्यांत तळमळ होती, ओठ तहानलेले होते. ती गयावया करत होती, पाण्याचा थेंब मिळावा म्हणून तडफडत होती.
डॉक्टरांचे ऐकून आपण आईचा जीव वाचवत आहोत, या एकाच विचाराने अरशदने आईची ती आर्त हाक ऐकली नाही. ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याला तो आईचे भले समजत होता, तेच क्षण आईच्या आयुष्याचे शेवटचे क्षण ठरणार आहेत, याची त्याला कल्पनाच नव्हती.
शांतता चिरत आईने घेतलेली ती शेवटची हुंदकेवजा श्वास... पाण्याची ती तडफड... अन् मग अचानक सर्व काही शांत झाले. अरशदच्या डोळ्यांसमोरच आईने पाणी मागत मागत प्राण सोडला.
त्या रात्रीनंतर अरशदचे आयुष्य कायमचे बदलून गेले. आजसुद्धा त्या क्षणाची आठवण झाली की त्याचा गळा भरून येतो. एका पॉडकास्ट दरम्यान जेव्हा हा विषय निघाला, तेव्हा अरशदचा आवाज थरथरत होता.
माझी आई वारंवार पाणी मागत राहिली... अन् मी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत राहिलो. काश मी त्या रात्री मी डॉक्टरांचे न ऐकता आईला पाणी पाजले असते... तर कदाचित आज ती जिवंत असती, असे तो जड अंतःकरणाने म्हणाला.
आईची शेवटची इच्छासुद्धा पूर्ण करता आली नाही, या विचारानेच त्याचे काळीज थरथरते. स्वतःच्या डोळ्यांसमोर आई तहानेने व्याकुळ होऊन जगातून निघून जावी अन् मुलगा हतबल होऊन पाहत राहावा, यापेक्षा मोठी वेदना मुलासाठी काय असू शकते.
एकाकीपण, संघर्ष अन् यशाची वाट
आई गेल्याच्या दुखातून सावरत असतानाच काही दिवसांतच वडिलांचे छत्रही हरपले. लहान वयातील मुलगा, ज्याला अजून जगाची रीतसुद्धा नीट समजली नव्हती, तो या अथांग जगात अचानक एकाकी पडला.
शिक्षण सुटले. पोट भरण्यासाठी हातातील पुस्तके बाजूला ठेवावी लागली. अरशदने रस्त्यावर उतरून घरोघरी सामान विकले, लहान-सहान नोकऱ्या केल्या. रोजचा दिवस भूक अन् एकाकीपणाशी एक नवीन लढाई घेऊन यायचा.
त्याने आपल्या वेदनेलाच आपली ताकद बनवले. डान्सच्या जगात पाऊल ठेवले, दिवसरात्र घाम गाळला, अपार मेहनत केली अन् आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले.
आज अरशद वारसी यशाच्या शिखरावर आहे. जग त्याच्या अभिनयाचे कौतुक करते. परंतु त्या झगमगाटामागे, मनाच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात आजसुद्धा ती तहानलेली आई पाणी मागत आहे... अन् तो मुलगा आजही त्या रात्रीच्या छायेत गप्प उभा राहून अश्रू गाळत आहे.