आजकाल सोशल मीडियावर अत्यंत संवेदनशील आणि धार्मिक शब्दांचा अगदी सहजतेने वापर केला जात आहे. याचा थेट परिणाम समाजात वाढणारा द्वेष आणि अविश्वासाच्या रूपात पाहायला मिळत आहे. 'आवाज द व्हॉईस'च्या 'दीन और दुनिया' या विशेष पॉडकास्टमध्ये बोलताना जामिया मिलिया इस्लामियाचे (नवी दिल्ली) माजी प्राध्यापक अख्तरुल वासे यांनी ही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
प्राध्यापक वासे यांनी 'काफिर' या संवेदनशील शब्दाच्या होत असलेल्या चुकीच्या वापराबद्दल अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, हा शब्द अनेकदा चुकीच्या संदर्भात वापरला जातो आणि त्यातून गैरसमज पसरवले जातात. धर्मावर चर्चा करणे ही काही वाईट गोष्ट नाही, मात्र खरी अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा धर्माचे कोणतेही सखोल ज्ञान नसलेले लोक धार्मिक शिकवणीचा आपापल्या सोयीनुसार अर्थ लावू लागतात.
या चर्चेदरम्यान असाही एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला की, सोशल मीडियावर केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी आजकाल धर्माला चक्क 'प्रोपगंडा' (अपप्रचार) चालवण्याचे साधन बनवले गेले आहे. या प्रवृत्तीमुळे केवळ बिगर-मुस्लिमांमध्ये इस्लामबद्दल गैरसमज वाढले आहेत असे नाही, तर खुद्द मुस्लिम समाजातील काही घटकांमध्ये नाहक श्रेष्ठत्वाची आणि न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे.
प्राध्यापक वासे यांनी अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवताना सांगितले की, सोशल मीडियावर अनेकदा जे खोटे श्रेष्ठत्व दाखवले जाते, ते प्रत्यक्षात त्यांच्या आत लपलेल्या खोल न्यूनगंडाचेच (Inferiority Complex) एक रूप असते.
धार्मिक अभ्यासक आणि विद्वानांचा आदर राखणे तसेच परस्पर सहिष्णुता वाढवणे किती गरजेचे आहे, यावरही त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मते, प्रत्येकाला आपल्या श्रद्धेचे पालन करण्याचा आणि ती व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, स्वतःचे विचार आणि धर्माचा स्वतः लावलेला अर्थ इतरांवर लादणे अजिबात योग्य नाही. कारण कोणताही धर्म कधीही सक्ती करायला शिकवत नाही.
भारतासारख्या देशात, जिथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने आणि शांततेत एकत्र राहत आले आहेत, तिथे एखाद्याच्या धार्मिक ओळखीवर उपहासात्मक किंवा अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणे हे सामाजिक सलोख्याला मोठा धक्का पोहोचवणारे आहे, असेही ते म्हणाले.
बहुपत्नीत्वाच्या (Polygamy) मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. समाजात याबद्दल असलेले अनेक लोकप्रिय समज चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. इस्लाममध्ये चार विवाहांची परवानगी असली, तरी ती काही सक्तीची किंवा बंधनकारक गोष्ट नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले.
या सविस्तर चर्चेच्या शेवटी प्राध्यापक वासे यांनी लोकांना एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, धर्माचे केवळ वरवरचे किंवा प्रतीकात्मक प्रदर्शन करणे टाळायला हवे. कारण अशा दिखाव्यामध्ये प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या काळातील किंवा त्यांच्या साथीदारांच्या (सहाबांच्या) आचरणातील साधेपणा कुठेच दिसत नाही. धर्म हा नेहमी अत्यंत सोप्या, अस्सल आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातूनच जगासमोर मांडला गेला पाहिजे, यावर त्यांनी आवर्जून भर दिला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -