ASHADI 2026: पंढरपुरात वारकऱ्याच्या जिवाचे रक्षण; शासकीय एअर अँब्युलन्स सेवेमुळे रुग्णाला वेळेत मिळाले उपचार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 10 h ago
पंढरपूर: आषाढी वारीदरम्यान आजार पडलेल्या वारकऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने सोलापूरला हलवण्यात आले.
पंढरपूर: आषाढी वारीदरम्यान आजार पडलेल्या वारकऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने सोलापूरला हलवण्यात आले.

 

मुंबई

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या गर्दीत लाखो भाविक दाखल झाले असताना, छातीत तीव्र वेदना झाल्यामुळे आजारी पडलेल्या ५४ वर्षीय वारकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाची एअर अँब्युलन्स देवदूता ठरली आहे. वारकरी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले आहे.

बाळू पडळू (वय ५४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या वारकऱ्याचे नाव असून, ते विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आले होते. दर्शन घेताना त्यांना अचानक छातीत अस्वस्थता जाणवू लागली. डॉक्टरांनी तीन रस्ता जवळील अतिदक्षता विभागात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तिथे ईसीजी तपासणीत त्यांना तातडीने विशेष उपचाराची गरज असल्याचे स्पष्ट झाले.

रस्ते वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी एअर अँब्युलन्सचा वापर

वारीमुळे रस्ते मार्ग पूर्णपणे गच्च झाल्यामुळे रुग्णाला सोलापूरला नेण्यासाठी रस्ते वाहतूक करणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे सोलापूरला हलवण्याचा निर्णय घेतला. एअर अँब्युलन्सने त्यांना सोलापूर विमानतळावर पोहोचवले, तिथून पुढील उपचारासाठी त्यांना यशोधारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सोलापूर विमानतळावर विमान उतरताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर अँब्युलन्समध्ये जाऊन बाळू पडळू यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना सर्वोतोपरी उपचाराचे निर्देश दिले.