PAPER LEAK PROTEST: मुंबईत हजारो विद्यार्थ्यांचा 'तिरंगा मोर्चा'; नीट पेपर लीक आणि पोलीस गैरवर्तनाविरोधात विरोधक आक्रमक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
मुंबई: नीट पेपर लीकविरोधी आंदोलनादरम्यान दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) काढण्यात आला भव्य तिरंगा मोर्चा.
मुंबई: नीट पेपर लीकविरोधी आंदोलनादरम्यान दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) काढण्यात आला भव्य तिरंगा मोर्चा.

 

मुंबई

नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणाविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शुक्रवारी मुंबईतील दादर परिसर हजारो आंदोलकांच्या गर्दीने दुमदुमला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवाजी पार्क मैदानावर काढण्यात आलेल्या 'तिरंगा मोर्चा'मध्ये हजारो विद्यार्थी, तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हातात तिरंगा झेंडा आणि विविध फलक घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडे लाठ्यांची ताकद असली, तरी आमच्या हातात तिरंगा आहे, असा इशारा त्यांनी दिला. तसेच युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना मागे न हटण्याचे आवाहन केले. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही जनझेडच्या (GenZ) या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली.

महिला पोलीस गैरवर्तन प्रकरण आणि राजकीय आरोप

दरम्यान, आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकासोबत साध्या वेशात असलेल्या अधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी या घटनेचा बचाव करत तो अधिकारी पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे.