नवी दिल्ली
देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. इंडिगो एअरलाईन्सची विमाने मोठ्या प्रमाणावर रद्द होत असल्याने निर्माण झालेल्या या अभूतपूर्व गोंधळाची आता संसदेने गंभीर दखल घेतली आहे. एका संसदीय समितीने खाजगी एअरलाईन्सच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना आणि नागरी विमान वाहतूक नियामकाला (DGCA) समन्स बजावण्याची शक्यता आहे.
जेडीयू (JD(U)) नेते संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील 'वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती' विषयक संसदीय स्थायी समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. ही समिती एअरलाईन्सचे प्रमुख अधिकारी, DGCA चे अधिकारी आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बोलावून स्पष्टीकरण मागणार आहे. विमानसेवेतील या मोठ्या व्यत्ययाचे कारण काय आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा जाब समिती विचारणार आहे.
खासदारांनाही बसला फटका
समितीच्या एका सदस्याने सांगितले की, हजारो प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्याची समितीने गंभीर नोंद घेतली आहे. इतकेच नाही तर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आलेल्या खासदारांनाही या गोंधळाचा फटका बसला आहे. इंडिगोची विमाने रद्द झाल्यामुळे आणि इतर एअरलाईन्सच्या उशिरमुळे खासदारांनाही त्रास सहन करावा लागला.
या परिस्थितीमुळे विमान तिकिटांचे दर प्रचंड वाढल्याच्या तक्रारी अनेक लोकांनी खासदारांकडे केल्या आहेत.
न्यायालयीन चौकशीची मागणी
दरम्यान, सीपीआय(एम) चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. ते वाहतूक स्थायी समितीचे सदस्य नाहीत, पण त्यांनी विमानांच्या या मोठ्या प्रमाणावरील गोंधळासाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करावी किंवा न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
सहाव्या दिवशीही गोंधळ
रविवारी (७ डिसेंबर २०२५) इंडिगोने दिल्ली आणि मुंबई विमानतळावरील २२० हून अधिक उड्डाणे रद्द केली. ऑपरेशन्स सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, सलग सहाव्या दिवशी हा गोंधळ सुरूच होता.
विमान वाहतूक नियामक असलेल्या 'DGCA' ने शनिवारी (६ डिसेंबर) कारवाई करत इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
इंडिगोचे स्पष्टीकरण
इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या 'इंटरग्लोब एव्हिएशन'च्या बोर्डाने रविवारी एक निवेदन जारी केले. त्यांनी सांगितले की, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक 'क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप' स्थापन केला आहे, जो नियमित बैठका घेत आहे. ग्राहकांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांना परतावा मिळवून देण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे यात म्हटले आहे.