भक्ती चाळक
पुणे शहर हे नेहमीच आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेसाठी ओळखले जाते. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'दावत-ए-इफ्तार' कार्यक्रमात या परंपरेचे दर्शन पुन्हा एकदा घडले. या कार्यक्रमाला शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस येथील असेंब्ली हॉल समोरील बॅडमिंटन कोर्टवर हा सोहळा उत्साहात पार पडला.
लष्कर पोलीस स्टेशन, जमियत उलेमा-ए-हिंद पुणे आणि महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंस यांच्या संयुक्त विद्यमाने या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये बंधुता, ऐक्य आणि परस्पर सौहार्द वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. देशात शांतता आणि सलोखा कायम राहावा, ही भावना यामागे होती. कार्यक्रमात विविध धर्मांचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभाग घेतला आणि सामाजिक ऐक्याचा एक सुंदर संदेश दिला.

पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार
या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील नामवंतांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांचे या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.
यावेळी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आयोजकांचे आभार मानतो. तसेच आमच्या सर्व पुणे पोलीस दलातर्फे सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देतो. याप्रकारचे अनेक कार्यक्रम पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात येतात आणि यापुढेही करण्यात येतील. मी सुरुवातीपासूनच शहरातील सर्व धर्मगुरूंच्या चांगल्या संपर्कात आहे. शहरात रमजान सण चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

कठीण काळात पोलिसांवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी मुस्लीम समाजाचे आभार मानले. तसेच बेकायदेशीर तस्करी आणि ड्रग्स विक्री करणाऱ्यांना आयुक्त अमितेश कुमार यांनी तंबी दिली. आणि त्यांच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे खडसावून सांगितले.
सौहार्द टिकवण्याचा निर्धार
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंसचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन आणि जमियत उलमा ए हिंद पुणेचे अध्यक्ष कारी इद्रीस अन्सारी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पुणेकरांनी आपापसातील बंधुभाव वाढवण्याचा संकल्प केला. देशात शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचा मोलाचा संदेश या इफ्तार कार्यक्रमातून सर्वदूर पोहोचवण्यात आला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -