पाकिस्तानी हस्तक, 'आयएसआय' (ISI), शेजारील देशातील गुंड आणि काही कट्टरतावादी यूट्यूबर्ससाठी काम करणाऱ्या दोन तरुणांना नोएडामधून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी ही मोठी कारवाई केली.
एटीएस सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेल्या पाकिस्तानी 'स्लीपर सेल'चा कसून तपास करत आहे. यात दोन तरुण थेट पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. यातला एक जण मेरठचा तर दुसरा दिल्लीचा आहे. हे दोघेही एका मोठ्या घातपाताच्या तयारीत होते.
अप्पर पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तयार झालेल्या 'स्लीपर सेल'ची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतरच एटीएसने हा तपास सुरू केला.
पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जट्ट आणि काही कट्टरतावादी पाकिस्तानी यूट्यूबर्स भारतीय तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयएसआयच्या इशाऱ्यावर ते हे काम करत आहेत. देशातील अंतर्गत शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी या तरुणांना पैशांचे मोठे आमिष दाखवले जात आहे. तपासात ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली.
संवेदनशील ठिकाणांची रेकी करणे आणि तिथे दहशतवादी हल्ले करणे, यासाठी या तरुणांना प्रवृत्त केले जात होते. तसेच, इस्लाम धर्म सोडलेल्या काही विशिष्ट व्यक्तींना अत्याधुनिक शस्त्रांनी लक्ष्य करण्यासाठीही त्यांना चिथावणी दिली जात होती.
मेरठचा रहिवासी तुषार चौहान ऊर्फ हिजबुल्लाह अली खान आणि दिल्लीचा समीर खान हे दोघे या जाळ्यात पूर्णपणे अडकले होते.
एटीएसच्या पथकाने या दोघांना नोएडामधून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि एक चाकू जप्त करण्यात आला आहे.
चौहानने प्राथमिक चौकशीत अनेक मोठी गुपिते उघड केली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी आणि आबिद जट्ट यांच्या संपर्कात आल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर व्हॉईस आणि व्हिडिओ 'पुश-टू-टॉक' कॉलवरून त्यांचे सातत्याने बोलणे व्हायचे.
भट्टीचा विश्वास जिंकण्यासाठी चौहानने त्याच्या नावाने इन्स्टाग्रामवर काही खाती उघडली. त्यातील एक खाते ब्लॉक झाले. त्यानंतर त्याने दुसरे खाते बनवले आणि भट्टीचा फोन नंबर मिळवून त्याच्याशी थेट संपर्क साधला, असा खुलासा अमिताभ यश यांनी केला.
भट्टीने चौहानला एका विशिष्ट व्यक्तीवर ग्रेनेड हल्ला करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्याला अत्याधुनिक शस्त्रे पुरवण्याचे आश्वासनही दिले होते. या कामासाठी चौहानला ५० हजार रुपये आगाऊ (अॅडव्हान्स) दिले जाणार होते. तर काम पूर्ण झाल्यावर अडीच लाख रुपये मिळणार होते. एवढेच नाही, तर दुबईमार्गे पाकिस्तानात जाण्याची व्यवस्थाही तो करून देणार होता.
भट्टीने चौहानला आणखी एक मोठी माहिती दिली होती. 'आयएसआय'चे तीन एजंट आपल्याला टार्गेट देतील, असे त्याने सांगितल्याचा दावा चौहानने चौकशीत केला.
समीर खान हादेखील सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात होता. 'तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान' असे भिंतींवर लिहिण्याचे आणि नेटवर्कमध्ये आणखी तरुणांना भरती करण्याचे काम त्याला दिले होते.
चौहानने इन्स्टाग्रामवरून समीरशी संपर्क साधला होता. पाकिस्तानी हस्तकांनी दिलेल्या सूचनेनुसार हे दोघेही घातपाताच्या तयारीत होते. यात टार्गेटची रेकी करण्याच्या कामाचाही यात समावेश होता.
भट्टी आणि जट्ट यांच्या सांगण्यावरून या आरोपींनी काही जणांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या धमकीच्या कॉलमध्ये पाकिस्तानी हस्तक कॉन्फरन्स कॉलद्वारे सहभागी असायचे.
या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेची विविध कलमे, शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांचे आणखी कोण साथीदार आहेत आणि हे नेटवर्क नेमके किती मोठे आहे, हे शोधून काढण्यासाठी पोलीस आता आरोपींच्या कोठडीची न्यायालयात मागणी करणार आहेत.