गोव्यात नाइट क्लबमध्ये भीषण आग लागून २३ जणांचा होरपळून मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 h ago
बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लब
बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लब

 

पणजी

गोव्यातील उत्तर गोवा भागात शनिवारी मध्यरात्री एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत किमान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा आणि पर्यटन क्षेत्र हादरून गेले आहे.

मृतांमध्ये बहुतांश क्लबच्या किचनमध्ये काम करणारे कर्मचारी असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३ ते ४ पर्यटकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. २३ मृतांपैकी तिघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला, तर इतरांचा धूर आणि गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.

अग्निशमन नियमांकडे दुर्लक्ष?

ही घटना अर्पोरा गावातील 'बर्च बाय रोमिओ लेन' या प्रसिद्ध क्लबमध्ये घडली. हा क्लब गेल्या वर्षीच सुरू झाला होता. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या क्लबने अग्निशमन सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले नव्हते.

"आम्ही क्लब व्यवस्थापनाविरुद्ध आणि ज्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करूनही क्लब सुरू ठेवण्यास परवानगी दिली, त्यांच्यावर कठोर कारवाई करू," असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. राज्याच्या किनारपट्टी भागात पर्यटनाचा हंगाम ऐन भरात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

बळींची ओळख आणि मदतकार्य

स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की, सर्व २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते बांबोळी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांनी रात्रभर बचावकार्य राबवले.

लोबो यांनी स्पष्ट केले की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व क्लब्सचे 'फायर सेफ्टी ऑडिट' केले जाईल. कळंगुट पंचायतीकडून सोमवारी सर्व नाइट क्लब्सना नोटीस बजावण्यात येणार असून, ज्यांच्याकडे आवश्यक परवानग्या नसतील त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल.

गोव्याचे पोलीस प्रमुख आलोक कुमार यांनी दुजोरा दिला की, सिलेंडर स्फोटामुळेच ही आग भडकली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.