जाहिदा खान : मुलींच्या शिक्षणासाठी खंबीर भूमिका घेणाऱ्या मेवातच्या पहिल्या महिला आमदार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
जाहिदा खान
जाहिदा खान

 

राजस्थानमधील अलवरपासून हरियाणातील नूंह-पलवल, फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशातील मथुरा-कोसी क्षेत्रापर्यंत पसरलेल्या मेवातसाठी आज जाहिदा खान हे नाव एक मोठी प्रेरणा बनले आहे. मेवातच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवणाऱ्या जाहिदा यांनी वकिली सोडून राजकारणात पाऊल ठेवले. आज त्या केवळ मेवातच्याच नव्हे, तर संपूर्ण राजस्थानमधील मुस्लिम राजकारणाचा मुख्य चेहरा बनल्या आहेत. त्यांचा राजकीय प्रवास न्यायालयातील कामकाजापासून सुरू होऊन विधानसभा आणि मंत्रिमंडळापर्यंत विस्तारला आहे. राजकारणाच्या गोटात आज त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा ऐकायला मिळते.

जाहिदा खान यांच्या राजकीय प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सामाजिक आणि राजकीय वारसा समर्थपणे खांद्यावर पेलला आहे. मेवातच्या राजकारणात त्यांच्या कुटुंबाचा मोठा इतिहास आहे. या भागातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक जाणीवांमध्ये चौधरी मोहम्मद यासीन खान, चौधरी तय्यब हुसेन आणि जाहिदा खान ही नावे सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहेत. जाहिदा या आपल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने संपूर्ण परिसरात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
 

जाहिदा यांचा जन्म ८ मार्च १९६८ रोजी झाला. मेवातच्या सामाजिक आणि राजकीय चेतनेशी घट्ट जोडलेल्या कुटुंबातून त्या येतात. त्यांचे आजोबा चौधरी मोहम्मद यासीन खान यांना मेवातमध्ये 'बाबा-ए-कौम' म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९२१ मध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांनी 'ब्रेन मेव हायस्कूल'ची स्थापना केली, त्याचे पुढे 'यासीन मेव पदवी महाविद्यालयात' रूपांतर झाले. मेव समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात उभे राहावे, असे त्यांचे स्वप्न होते. यासीन खान हे संयुक्त पंजाब विधान परिषदेचे सदस्य (१९२६-१९४५) आणि स्वातंत्र्यानंतर पंजाब विधानसभेचे सदस्य (१९५२-१९६२) राहिले. १९५७ मध्ये बिनविरोध आमदार निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. फाळणीच्या वेळी त्यांनी मेव समाजाच्या पाकिस्तानमधील स्थलांतराला विरोध केला आणि महात्मा गांधींना बोलावून मेव समाजाचे मनोधैर्य वाढवले. याच कारणामुळे आज मेव समाज भारतात आत्मविश्वासाने उभा आहे.

जाहिदा यांचे वडील चौधरी तय्यब हुसेन हे भारतीय राजकारणातील अशा दुर्मिळ नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये मंत्रीपद भूषवले. ते नूंह आणि तावडू भागातून आमदार राहिले, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि शिक्षण, अल्पसंख्याक अधिकार तसेच सामाजिक न्यायाचे खंबीर पुरस्कर्ते राहिले. त्यांच्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वामुळे संपूर्ण मेवात संघटित होण्यास मदत झाली.

जाहिदा यांच्या कुटुंबात दोन भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. मोठे भाऊ झाकीर हुसेन हरियाणा वक्फ बोर्डाचे प्रशासक असून त्यापूर्वी ते नूंह आणि तावडू येथून तीन वेळा आमदार राहिले आहेत. धाकटे भाऊ फजल हुसेन यांनी राजस्थानमधील तिजारा भागातून विधानसभा निवडणूक लढवली आहे. मोठी बहीण स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांचे पती कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत. जाहिदा यांनी आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीतील जेएमसी स्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर एम.डी.यू. रोहतक येथून पदवी मिळवली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आणि राजस्थानच्या राजकारणात येण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात वकिली केली.

राजकीय कारकीर्द आणि यश

वर्ष २००० मध्ये त्यांचे वडील चौधरी तय्यब हुसेन हे गेहलोत सरकारमध्ये मंत्री असताना पंचायत निवडणुका झाल्या. कामा पंचायत समिती महिला कोट्यासाठी आरक्षित होती. भागातील लोकांनी एकमताने निर्णय घेतला की जाहिदा याच सर्वात योग्य उमेदवार आहेत. सर्वांच्या सहकार्याने त्यांनी निवडणूक लढवली आणि बिनविरोध निवडून येत त्या कामा पंचायत समितीच्या सभापती बनल्या. ही उपलब्धी आजही एक विक्रम म्हणून नोंदवली गेली आहे.

राजकारणात आल्यापासून जाहिदा यांनी सामाजिक विकास आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. विशेषतः मुलींचे शिक्षण ही त्यांची मोठी प्राथमिकता राहिली. २००८ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाल्या. या विजयासोबत त्या मेवातच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. त्यांनी २०१३ पर्यंत सातत्याने जनतेची सेवा केली आणि २०१८ च्या विधानसभा निवडणुकीतही यश मिळवले. या काळात त्यांनी राजस्थान सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्याकडे शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला-संस्कृती, मुद्रण आणि स्टेशनरी अशा विभागांची जबाबदारी होती.
 

कौटुंबिक सहकार्य

जाहिदा खान यांचे पती जलीस खान हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जलीस खान राजकीय कामात आवश्यकतेनुसार मदत करतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळतात. ते सांगतात, "चौधरी तय्यब हुसेन यांच्या निधनानंतर जाहिदा यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबत दोन्ही कुटुंबांची म्हणजे आमची आणि पूर्ण चौधरी कुटुंबाची संमती होती."

जाहिदा यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी डॉक्टर असून मुलगा साजिद खान याने एलएलबी पूर्ण केले आहे. २०२१ मध्ये साजिदची पहाडी पंचायत समितीच्या प्रधानपदी बिनविरोध निवड झाली. तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासोबतच राजकीय जबाबदाऱ्याही पार पाडतो. कुटुंबाने जाहिदा यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले असून त्यातूनच त्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची कार्यशैली, धाडस आणि प्रामाणिकपणामुळे लोक त्यांच्यात त्यांच्या वडिलांची झलक पाहतात.

माजी मंत्री जाहिदा खान म्हणतात, "आजच्या काळात राजकारणात स्पष्ट आणि निष्पक्ष पद्धतीने काम करणे अत्यंत कठीण झाले आहे. गेल्या १५-२० वर्षांत राजकीय वातावरणात खूप बदल झाला असून चांगले लोक राजकारणात येण्यास कचरू लागले आहेत. राजकारण आता केवळ सेवेचे माध्यम उरले नसून ते व्यवसायाशी जोडले गेले आहे. लोक याकडे व्यापाराच्या दृष्टीने पाहू लागले आहेत, ही लोकशाहीसाठी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक बाब आहे."
 

मेवातचा वारसा आणि योगदान

मेवातच्या सामाजिक आणि राजकीय चेतनेच्या इतिहासात काही मोजक्या कुटुंबांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. या कुटुंबांशिवाय या क्षेत्राचा इतिहास अपूर्ण आहे. यासीन खान यांचे शिक्षण, तय्यब हुसेन यांचे राजकारण आणि जाहिदा खान यांचे महिला नेतृत्व ही तीन पिढ्यांची शिदोरी मेवातची ओळख बनली आहे. जाहिदा खान यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर शिक्षण आणि सामाजिक न्यायालाही आपले उद्दिष्ट मानले. त्या एआयसीसी (AICC) सदस्य, राजस्थान पीसीसी पदाधिकारी आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीस राहिल्या आहेत. त्यांचे भाऊ झाकीर हुसेन यांनी हरियाणा आणि मेवातमध्ये तीन वेळा आमदार राहून आपल्या कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेली आहे.

समाज आणि लोकशाहीसाठी संदेश

जाहिदा खान यांचा राजकीय प्रवास हा संदेश देतो की सेवा आणि समाजाप्रती समर्पण हेच खरे राजकारण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मेवातचे लोक शिक्षण आणि विकासाच्या वाटेवर पुढे जात आहेत. हे कुटुंब सत्तेपेक्षा सेवा, पदापेक्षा सिद्धांत आणि राजकारणापेक्षा समाजाला महत्त्व देण्याचे उत्तम उदाहरण आहे. मेवातची ओळख असलेले शिक्षण, राजकारण आणि महिला नेतृत्व हे तीन पिढ्यांच्या मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ आहे. ही केवळ एका कुटुंबाची कथा नसून संपूर्ण क्षेत्राच्या सामाजिक आणि राजकीय जागृतीची कथा आहे. जाहिदा खान यांनी हा वारसा जपत आधुनिक राजकारणात महिलांसाठी आणि समाजासाठी नवे मार्ग खुले केले आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter