फौकिया वाजिद : स्वतःच्या कर्तृत्वाने नावाचा अर्थ सार्थ करणारी एक अष्टपैलू क्रिएटीव्ह लीडर
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 3 h ago
फौकिया वाजिद
सानिया अंजुम
"उत्कृष्टता म्हणजे दुसऱ्यांशी स्पर्धा करणे नव्हे, तर स्वतःचीच पातळी दिवसेंदिवस उंचावणे होय," असे फौकिया वाजिद आवर्जून सांगतात. योगायोग म्हणजे त्यांच्या 'फौकिया' या नावाचा अरबी अर्थही 'उत्कृष्ट' असाच आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबाचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतानाही, एका ज्योतिषाने हे नाव सुचवले होते.
जरी कुटुंब या गोष्टी मानत नव्हते, तरीही हे नाव त्यांच्यासोबत राहिले. एखाद्या भविष्यावाणीप्रमाणे या नावाने त्यांच्या आयुष्याला दिशा दिली आणि स्वतःला सतत सुधारत राहण्याच्या त्यांच्या जिद्दीशी ते नाव एकरूप झाले. १९९२ मध्ये त्यांचा जन्म अशा घरात झाला जिथे विद्वत्ता, भाषा आणि बौद्धिक कुतूहल रोजच्या जगण्याचा भाग होते. फौकिया यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई आपल्या पीएचडीचा प्रबंध पूर्ण करत होती. त्यामुळे शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नसून ती एक अखंड साधना आहे, हे संस्कार त्यांच्यावर नकळत झाले.
साहित्यिक वातावरणात वाढल्यामुळे कलेची फौकिया यांना वेगळी ओळख करून द्यावी लागली नाही; कला त्यांच्या आसपासच होती. साहित्य त्यांच्यासाठी अवांतर विषय नव्हता, तर जीवनातील चढ-उतार समजून घेण्याचे ते एक माध्यम होते. लहानपणापासूनच साहित्यिक बैठका आणि कवितांच्या मैफिलींमध्ये त्यांचे बालपण गेले. यामुळे जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप लवकर प्रगल्भ झाला. लिहिणे त्यांच्या रक्तातच होते. पहिलीत असताना त्यांनी 'स्काय' नावाची पहिली कविता लिहिली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा 'स्क्रीच' हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्या दिवसांची आठवण सांगताना त्या म्हणतात, "लिहिणे ही माझी निवड नव्हती. जगाला समजून घेण्याची ती माझी एकमेव पद्धत होती."
फौकिया यांनी जनसंवाद (मास कम्युनिकेशन) क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक आणि तितक्याच धाडसाने घेतला. त्या काळात सर्जनशील क्षेत्रातील करिअरकडे, विशेषतः स्त्रियांसाठी, फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली. त्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, "जेव्हा मी मास कम्युनिकेशन निवडले, तेव्हा मला सतत प्रश्न विचारले गेले. पण हे क्षेत्र एक महत्त्वाचे शस्त्र आहे, हे मला ठाऊक होते. जर तुम्ही तुमची गोष्ट स्वतः सांगितली नाही, तर दुसरे कोणीतरी ती त्यांच्या पद्धतीने सांगतील."
त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. तिथे त्या केवळ विद्यार्थिनी राहिल्या नाहीत, तर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा म्हणून एक खंबीर नेतृत्व म्हणूनही समोर आल्या. त्यांचे नेतृत्व हे सत्तेवर नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन चालण्यावर आधारित होते.
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी फौकिया यांनी एका स्वयंसेवी संस्थेची (NGO) स्थापना केली. ही संस्था एखाद्या संघटनेपेक्षा एका चळवळीसारखी जास्त होती. तरुण पिढी सर्जनशील क्षेत्रात गंभीर नसते, हा समज मोडीत काढणे हा त्यांचा उद्देश होता. अवघ्या ४५ दिवसांत अशोक साहनी आणि एम. एस. सत्यु यांसारख्या दिग्गजांचे लक्ष त्यांच्या कामाकडे वेधले गेले. त्या म्हणतात, "तरुणांना नेहमी आपली पाळी येईपर्यंत थांबायला सांगितले जाते. मला अशी जागा निर्माण करायची होती जिथे वयापेक्षा तुमच्यातील कौशल्याला जास्त किंमत असेल."
त्यांच्या या सर्जनशील प्रवासाने लवकरच मुख्य प्रवाहातील माध्यमात प्रवेश केला. कलर्स कन्नड (व्हायकॉम) साठी निवडल्या गेलेल्या पहिल्या चार लेखकांमध्ये फौकिया यांचा समावेश होता. त्यांनी राधा रमणा या मालिकेच्या १५० भागांसाठी लेखन केले. विशेष म्हणजे, अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेला असतानाही त्यांनी अनिश्चिततेने भरलेल्या पण आवडत्या अशा कथालेखनाच्या क्षेत्राची निवड केली. त्यांच्या कामाने त्यांना मुंबईत आणले. तिथे त्यांनी 'व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स'मध्ये क्रिएटिव्ह आणि डेव्हलपमेंट विभागात निर्माता म्हणून काम केले. यादरम्यान त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील स्क्रीप्ट हाताळल्या आणि अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये योगदान दिले.
व्यावसायिक यश मिळूनही त्यांनी आपला मूळ उद्देश कधीच विसरला नाही. त्या म्हणतात, "मोठी व्यासपीठे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतात, पण तुमचे काम किती अर्थपूर्ण ठरेल हे तुमच्या हेतूवर अवलंबून असते."
डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग आणि संस्कृती संवर्धन हे त्यांचे खरे ध्येय होते. कर्नाटक उर्दू अकादमी अंतर्गत त्यांनी कर्नाटकातील दिग्गज उर्दू लेखकांवर माहितीपट (डॉक्युमेंटरी) दिग्दर्शित केले. याद्वारे त्यांनी दुर्लक्षित राहिलेल्या साहित्यिक आवाजांना पुन्हा लोकांच्या स्मरणात आणले. आपले पती रिझवान यांच्यासोबत त्यांनी मदुराईमध्ये १६ एमएम फिल्म प्रकल्पांवर काम केले. यात 'फौझिया नामा' या माहितीपटाचा समावेश होता, जो त्यांच्या आईवर - फौझिया चौधरी यांच्यावर आधारित होता. याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "हा चित्रपट केवळ माझ्या आईबद्दल नव्हता. तो अशा पिढीतील स्त्रियांचे दस्तऐवजीकरण होता, ज्यांचे बौद्धिक कष्ट अनेकदा जगाच्या नजरेआड राहतात."
आज 'झूक फिल्म्स'च्या (Zooq Films) संस्थापक-सीईओ म्हणून फौकिया कलेचा दर्जा आणि उद्योगाची वास्तवता यांचा समतोल राखत आहेत. स्वतंत्र माहितीपटांच्या निर्मितीपासून ते 'एमटीआर' आणि 'मर्सिडीज बेंझ' यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत काम करण्यापर्यंत, 'झूक फिल्म्स' ही त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. दर्जेदार आशय आणि व्यावसायिक काम एकत्र नांदू शकते, यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व हे सहानुभूती आणि मार्गदर्शनावर आधारित आहे. त्या म्हणतात, "सर्जनशील क्षेत्रात स्वतःची जागा शोधणे किती कठीण आहे, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे जेव्हा मी एखाद्या टीमचे नेतृत्व करते, तेव्हा सर्वांचे विचार ऐकले जातील याची खात्री करणे ही माझी पहिली जबाबदारी असते."
फौकिया यांचे काम सातत्याने स्त्रियांचे प्रश्न, प्रतिनिधित्व आणि सामाजिक संस्कार या विषयांना हात घालते. पॉडकास्ट आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्या कठीण विषयांवर भाष्य करतात आणि स्त्रियांना त्यांच्या सोयीच्या चौकटीतून बाहेर पडण्याचे आवाहन करतात. त्या ठामपणे सांगतात, "स्त्रियांमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण सामाजिक बंधने, आळस आणि भीती आपल्याला मागे खेचते. आणि हे खरं आहे की, स्त्रियांसाठी मार्ग दहापट जास्त कठीण आहे." तरीही, डिजिटल मीडियाच्या युगामुळे त्या आशावादी आहेत. त्यांच्या मते, "ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल साधनांनी खेळाचे नियम बदलले आहेत. आज पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या जगात स्त्रिया स्वतःचा आशय स्वतः तयार करू शकतात."
मौन पाळण्याचे परिणाम काय होतात, याची त्यांना जाणीव आहे. फौकिया इशारा देतात की, "जर आपले योग्य प्रतिनिधित्व नसेल, तर आपण इतरांनी मांडलेले विचार आंधळेपणाने स्वीकारतो. जेव्हा आपल्या कथा हरवतात, तेव्हा दुसरे लोक आपली व्याख्या ठरवतात." याच विश्वासामुळे त्या मास कम्युनिकेशनला एक शक्तिशाली शस्त्र मानतात. त्या म्हणतात, "रेडिओ आणि टेलिव्हिजनचा वेग कदाचित मंदावला असेल, पण कथा सांगणे थांबलेले नाही. स्वतःचा आशय तयार करा. उपलब्ध साधनांचा वापर करा. पत्रकारिता, राजकारण किंवा मीडिया तुमच्यासाठी नाही, असे म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही."
वयाच्या तिशीनंतरच्या नव्या दशकात पाऊल ठेवताना फौकिया मास कम्युनिकेशनमध्ये पीएचडी करत आहेत आणि आपला व्यवसायही वाढवत आहेत. त्यांच्यासाठी आता यशाचा अर्थ बदलला आहे. त्या साध्या शब्दांत सांगतात, "आज माझ्यासाठी यश म्हणजे प्रभाव. तुमचे काम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते का, त्यांचा दृष्टिकोन बदलते का किंवा कोणाला सक्षम करते का, हेच माझ्यासाठी खरे यश आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -