डॉ. सय्यद सेहरीश असगर : काश्मीरी तरुणींसाठी रोल मॉडेल ठरलेल्या धडाडीच्या आयएएस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
डॉ. सय्यद सेहरीश असगर
डॉ. सय्यद सेहरीश असगर

 

एहसान फाजली

एक प्रतिभावान आणि प्रतिष्ठित नागरी सेवा अधिकारी डॉ. सय्यद सेहरीश असगर (आयएएस, २०१३ बॅच, पंजाब कॅडर) गेल्या काही वर्षांत देशातील आणि विशेषतः जम्मू-काश्मीरमधील तरुण मुलींसाठी एक आदर्श बनल्या आहेत. जम्मू येथील 'बात्रा मेडिकल कॉलेज'मधून त्यांनी एमबीबीएसची पदवी पूर्ण केली आहे. त्यांचे वडील सय्यद असघर हे जम्मू-काश्मीर सरकारमध्ये वरिष्ठ केएएस (काश्मीर प्रशासकीय सेवा) अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या वडिलांच्या याच लोकसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

सनदी सेवेत प्रवेश करण्याच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नात डॉ. सेहरीश यांनी २०१० मध्ये जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवा (केएएस) परीक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे या परीक्षेत त्यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. ही परीक्षा टॉप करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. परंतु जीवनात अधिक उंच ध्येय गाठण्याच्या इच्छेने त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 

डॉ. सय्यद सेहरीश असगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशात ११८ वा क्रमांक मिळवून केंद्रीय नागरी सेवेत यश मिळवले आणि त्या २०१३ मध्ये आयएएस बनल्या. याच्या एक वर्ष आधी म्हणजेच आपल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्यांनी काश्मीरमधील बडगाम येथे एएसपी म्हणून कामही पाहिले होते.
 

जम्मू-काश्मीर सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर त्यांनी याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात पंजाबमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रशासकीय सचिव आणि विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या सेवाकाळात त्यांनी बारामुल्ला आणि बडगाम जिल्ह्यांचे डेप्युटी कमिशनर (जिल्हाधिकारी) म्हणून काम पाहिले आहे. सन १९७९ मध्ये बडगाम जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून तिथल्या पहिल्या महिला डेप्युटी कमिशनर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांनी जून २०१८ मध्ये बडगामच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला होता.

यानंतर त्यांनी 'जम्मू-काश्मीर ग्रामीण उपजीविका मिशन'चे (जेकेआरएलएम) मिशन डायरेक्टर म्हणून काम पाहिले. या पदावर असताना त्यांनी 'साथ' (टूगेदर फॉर बेटर टुमारो) नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना सक्षम करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या मोहिमेअंतर्गत ५ लाखांपेक्षा जास्त महिलांना ६०,००० स्वयंसहायता समूहांशी जोडण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी तब्बल ११६१ कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्यात आले.
 

त्यांनी २०२२ ते जानेवारी २०२४ या काळात बारामुल्लाचे डेप्युटी कमिशनर म्हणून अविरत सेवा दिली. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या प्रशासकीय सचिव पदाची धुरा सांभाळली. यासोबतच त्यांच्याकडे 'जम्मू-काश्मीर इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन एजन्सी'च्या (ईआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला होता. जानेवारी २०२६ पर्यंत त्यांनी हे पद यशस्वीपणे सांभाळले. आपल्या सेवाकाळात त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारचे माहिती संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

यापूर्वी डॉ. सेहरीश असगर यांनी पंजाबमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. यामध्ये त्यांनी गुरदासपूरचे एसडीएम आणि पंजाबचे एडीसी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तर त्यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीदरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

१ जून १९८६ रोजी जन्मलेल्या डॉ. सेहरीश यांचे शालेय शिक्षण जम्मू येथील 'प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट' स्कूलमधून झाले. शालेय जीवनापासूनच त्या प्रत्येक परीक्षेत अव्वल येत राहिल्या. जम्मूच्या बात्रा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करतानाही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर २०१० च्या काश्मीर प्रशासकीय सेवेच्या परीक्षेतही त्यांनी राज्यात पहिले येण्याचा बहुमान मिळवला होता.

बारामुल्ला जिल्ह्यातील 'एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम' (आकांक्षी जिल्हा कार्यक्रम) मधील त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२३ मध्ये प्रतिष्ठित 'पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टतेचा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. सेहरीश यांचा विवाह त्यांचेच सहकारी आणि काश्मीरचे आयएएस अधिकारी (एजीएमयूटी कॅडर-२०१०) डॉ. सय्यद आबिद रशीद शाह यांच्याशी झाला आहे. डॉ. आबिद यांनीही प्रशासनात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यांचे डेप्युटी कमिशनर तसेच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. नुकतीच याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची चंदीगड येथे बदली झाली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter