सना खान : हजारो शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
सना खान
सना खान

 

ओनिका माहेश्वरी

समाजाची सेवा करण्यासाठी आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी अनेक जण आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. म्हणूनच समाजसेवकांना समाजात मोठा आदर मिळतो. परंतु अशा प्रत्येक चांगल्या उपक्रमाच्या मागे संघर्षाची आणि दृढनिश्चयाची एक वैयक्तिक गोष्ट दडलेली असते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे ३४ वर्षांच्या सामाजिक उद्योजक सना खान! 

सना खान यांनी २६ फेब्रुवारी २०१० रोजी 'राहत फाउंडेशन'ची स्थापना केली. गेल्या १४ वर्षांपासून ही संस्था वंचित घटकांना मदत करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आज या संस्थेच्या शाखा उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अतिशय सक्रियपणे कार्यरत आहेत.

'आवाज-द-व्हॉईस'शी बोलताना सना खान यांनी सांगितले की, शाळा सोडणाऱ्या मुलींच्या समस्येवर त्या प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतात. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या या मुलींना पुन्हा एकदा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतात. या मुलींना 'जामिया मिलिया इस्लामिया' आणि 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग' यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांची संस्था मदत करते. 
 

शिक्षण हे यशाचे सर्वात महत्त्वाचे साधन असून तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, असे त्या मानतात. यात मुलगा-मुलगी असा कोणताही भेदभाव असणार नाही, यावर त्यांचा भर असतो. केवळ याच एका उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत जवळपास २ हजार शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षण संस्थांमध्ये आणले आहे.

राहत फाउंडेशन गरजूंना सर्व बाजूंनी मदत पुरवते, यावर सना खूप भर देतात. शिक्षणासोबतच ही संस्था मुलांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवते. केवळ प्रशिक्षण देऊन ही संस्था थांबत नाही, तर तिथून शिकून बाहेर पडणाऱ्या उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याची जबाबदारीही स्वीकारते. यामध्ये डिजिटल मार्केटिंग, फॅशन डिझायनिंग आणि इतर व्यावसायिक कौशल्यांच्या कोर्सेसचा समावेश आहे. या संस्थेने दिल्लीतील सुमारे २५६ वंचित मुलींना ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहनचालक परवाना मिळवून देण्यासाठीही मोठी मदत केली आहे.

सना यांच्या माहितीनुसार, संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर आजपर्यंत सुमारे १ हजार तरुण-तरुणींना चांगला रोजगार मिळाला आहे. जवळपास ६ हजार विद्यार्थ्यांनी डिजिटल मार्केटिंगचे धडे घेतले आहेत, तर ४ हजार तरुणींनी फॅशन डिझायनिंगच्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला आहे. या मुलांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी सना स्वतः ओखला फेज २ मधील फॅशन उद्योगातील कंपन्यांशी संपर्क साधतात. याशिवाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, कॉल सेंटर्स तसेच स्विगी, झोमॅटो आणि ओला यांसारख्या कंपन्यांशी समन्वय साधून त्या कुशल उमेदवारांना नोकरी मिळवून देतात.
 

सना यांच्या स्वतःच्या आयुष्याचा प्रवास खूप संघर्षाचा आणि जिद्दीचा राहिला आहे. त्या जेव्हा अवघ्या १३ वर्षांच्या होत्या आणि आठवीत शिकत होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि दोन मोठे भाऊ होते. वडिलांच्या जाण्याने कुटुंबावर आर्थिक अडचणींचा डोंगर कोसळला. त्या कठीण काळात सोसलेल्या हालअपेष्टांचे वर्णन करण्यासाठी शब्दही पुरेसे नाहीत, अशी आठवण त्या सांगतात. अशा अत्यंत कठीण प्रसंगात एका सेवाभावी संस्थेकडून मिळालेल्या मदतीने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. तिथूनच प्रेरणा घेऊन, आपणही आपल्या आयुष्यात अशाच परिस्थितीत अडकलेल्या इतर लोकांना मदत करायची, असा पक्का निर्धार त्यांनी केला.

आज राहत फाउंडेशन गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेची फी, पुस्तके आणि इतर आवश्यक साहित्यासाठी पूर्ण शैक्षणिक मदत पुरवते. काम करताना कधीकधी आर्थिक अडचणी नक्कीच येतात, पण समाजातील संवेदनशील नागरिक देणग्या आणि निधी संकलनाच्या माध्यमातून या कामाला हातभार लावतात.

कामातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या गोष्टींना सना खूप महत्त्वाच्या मानतात. कोणालाही मदत करण्यापूर्वी संस्था प्रत्येक प्रकरणाची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करते. त्या व्यक्तीची खरी गरज समजून घेतली जाते. त्यानंतरच गरजू उमेदवारांना संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये सामील करून योग्य ती मदत दिली जाते. राहत फाउंडेशन हे केवळ मुलींसाठीच नाही, तर गरजू मुलांसाठीही तितक्याच तत्परतेने काम करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात सना यांनी हितचिंतकांचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. आज दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये वंचितांना मदत करण्यासाठी सुमारे ७० लोकांची टीम कार्यरत आहे.
 

भविष्यातील योजनांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, शाळा सोडलेल्या मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी बंगळुरू येथे एक नवीन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही संस्था नियमितपणे जनजागृती शिबिरांचे आयोजन करत असते. आतापर्यंत राहत फाउंडेशनने अशा ५०० ते ६०० शिबिरांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना सना म्हणाल्या की, २०१० मध्ये 'साऊथ दिल्ली पॉलिटेक्निक'मधून मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी 'सहारा'मध्ये नोकरी केली. परंतु वंचितांना मदत करण्याची त्यांची तीव्र इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच ओढीने शेवटी त्यांनी नोकरी सोडून राहत फाउंडेशनची स्थापना केली.

कोरोनाच्या महासाथीच्या काळात या संस्थेचे काम खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. त्या टाळेबंदीच्या काळात त्यांनी गरजूंना ब्लँकेट्स, कोरडे रेशन किट्स, औषधे, शालेय दप्तरे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सना यांच्या या बहुमूल्य योगदानाची दखल केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. त्यांना नुकताच दुबई येथे एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय दिल्ली आणि बंगळुरू यांसारख्या शहरांमध्येही विविध मंचांवर त्यांचा गौरव झाला आहे.

सामाजिक कल्याणासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व नागरिकांना सना खान यांनी राहत फाउंडेशनशी जोडले जाण्याचे आवाहन केले आहे. संस्थेच्या कामात स्वयंसेवक, पाठीराखे आणि देणगीदार म्हणून सहभागी होणाऱ्या सर्वांचे त्या मनापासून स्वागत करतात. अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या चळवळीत सामील व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. 

दिल्लीतील जसोला गावात असलेल्या आपल्या कार्यालयातून सना आज या फाउंडेशनचे काम पाहत आहेत. शिक्षण हीच सक्षमीकरणाची आणि कायमस्वरूपी बदलाची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासाच्या बळावर त्या आपला सेवायज्ञ पुढे नेत आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter