शायस्ता अंबर : मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणारे धडाडी नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
शायस्ता अंबर
शायस्ता अंबर

 

अर्सला खान

भारतामध्ये जेव्हा जेव्हा महिलांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण या विषयांवर चर्चा होते, तेव्हा शायस्ता अंबर यांचे नाव सर्वात आधी डोळ्यांसमोर येते. महिलांनी घराबाहेर पाऊल टाकणे हे देखील एक मोठे आव्हान मानले जात होते, अशा अत्यंत कठीण काळात त्यांनी सामाजिक रूढींच्या साखळ्या तोडण्याचे धाडस दाखवले. 

शायस्ता अंबर यांनी केवळ जुनाट परंपरांना आव्हान दिले नाही, तर मुस्लिम महिलांना त्यांच्या खऱ्या धार्मिक आणि घटनात्मक अधिकारांची ओळख करून दिली. आज 'ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्डा'च्या संस्थापक-अध्यक्षा आणि एक ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या देशातील कोट्यवधी लोकांसाठी एक मोठी प्रेरणा बनल्या आहेत.

शायस्ता अंबर यांचा जन्म १९६२ मध्ये अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथील एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून कार्यरत होते, तर त्यांची आई एक सुप्रसिद्ध उर्दू कवयित्री होत्या. साहित्य आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या घरात वाढल्यामुळे शायस्ता यांना बालपणापासूनच पुस्तकांची आणि बौद्धिक चर्चांची सोबत मिळाली. 
 

शायस्ता यांचे कुटुंब त्यांना अत्यंत नशीबवान मानत असे. अभ्यासात त्या नेहमीच हुशार होत्या. अगदी लहान वयातच त्यांनी देशातील आणि परदेशातील प्रतिष्ठित मासिकांसाठी कथा आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली होती.

पुढे त्यांचा विवाह एक प्रतिष्ठित सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध उर्दू कवी मोहम्मद इद्रीस अंबर यांच्याशी झाला. एका साहित्यिक वातावरणातून दुसऱ्या साहित्यिक वातावरणात प्रवेश केल्यानंतरही शायस्ता यांनी वाचन, लेखन आणि समाजाचे बारकाईने निरीक्षण करण्याचा आपला छंद सुरूच ठेवला. या अनुभवातूनच त्यांना महिलांवर होणाऱ्या अन्यायाची आणि भेदभावाची तीव्र जाणीव झाली. या जाणिवेने त्यांच्यातील समाजसुधारकाला जागे केले.

सुमारे १९९७ च्या सुमारास लखनौमध्ये राहत असताना शायस्ता अंबर सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. दररोज अनेक मुस्लिम महिला घरगुती हिंसाचार किंवा अचानक मिळालेल्या घटस्फोटाच्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडे येत असत. एकाच दमात तीन वेळा तलाक म्हणण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. अनेकदा रागाच्या भरात, नशेच्या अंमलाखाली किंवा फोनवरूनही असे घटस्फोट दिले जात होते. या पीडित महिलांची हतबलता पाहून शायस्ता यांचे मन प्रचंड हेलावून गेले.

 
या समस्येचे मूळ समजून घेण्यासाठी त्यांनी कुराण आणि इस्लामी न्यायशास्त्राचा अतिशय सखोल अभ्यास केला. एकाच वेळी दिला जाणारा 'ट्रिपल तलाक', 'हलाला', 'बहुपत्नीत्व' आणि लग्नाच्या वेळी द्यायच्या 'मेहर' रकमेला नकार देणे या गोष्टी इस्लामचा भाग नाहीत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. या प्रथा केवळ काळाच्या ओघात निर्माण झालेल्या सामाजिक विकृती आहेत आणि महिलांचे शोषण करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

या अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी एक मोठी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम उघडली. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी एक 'मॉडेल निकाहनामा' (लग्नाचा करारनामा) तयार केला. या मसुद्याचे भारतात आणि परदेशातही प्रचंड कौतुक झाले. या दस्तऐवजात लग्नाच्या वेळीच महिलांना अनेक महत्त्वाचे कायदेशीर संरक्षण देणाऱ्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

मुस्लिम समाजातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी असणारे बहुतांश मोठे मंच हे पुरुषांच्या वर्चस्वाखाली होते. तिथे महिलांना स्वतःचे मत मांडण्यासाठी कोणतीही जागा मिळत नव्हती. ही मोठी उणीव भरून काढण्यासाठी शायस्ता अंबर यांनी २००५ मध्ये 'ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्डा'ची स्थापना केली.
 

हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुस्लिम महिलांना एक भक्कम व्यासपीठ मिळवून दिले. येथे महिला लग्न, घटस्फोट, पोटगी, शिक्षण आणि मालमत्तेचे अधिकार या विषयांवर कोणत्याही भीतीशिवाय उघडपणे चर्चा करू लागल्या. त्यांनी देशभर जनजागृती मोहिमा राबवल्या. महिलांना केवळ भारतीय संविधानाचीच नव्हे, तर त्यांच्या धर्माने त्यांना दिलेल्या अधिकारांचीही माहिती असायला हवी, या विचारांवर त्या नेहमीच ठाम राहिल्या.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा एकाच वेळी दिल्या जाणाऱ्या 'ट्रिपल तलाक'ला बेकायदेशीर घोषित केले, तेव्हा शायस्ता यांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. हा देशातील निम्म्या लोकसंख्येचा मोठा विजय आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता.

मशिदींमध्ये महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा नेहमीच वादाचा राहिला आहे. विशेषतः उत्तर भारतात महिलांसाठी मशिदीत जाऊन प्रार्थना करण्याची व्यवस्था खूप मर्यादित होती. या जुनाट परंपरेला छेद देण्यासाठी शायस्ता अंबर यांनी लखनौमध्ये 'अंबर मशीद' उभारली. महिलांची सोय आणि त्यांचा सहभाग डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आलेली ही देशातील पहिलीच मशीद मानली जाते.
 
या अंबर मस्जिदमध्ये पुरुष आणि महिला दोघेही अत्यंत आदराने आणि समानतेने वेगवेगळ्या रांगेत एकत्र प्रार्थना करू शकतात. महिलांना मशिदीत जाण्यास इस्लाममध्ये कुठेही बंदी नाही, असा युक्तिवाद शायस्ता करतात. आज ही मशीद केवळ एक प्रार्थनास्थळ नसून स्त्री-पुरुष समानता आणि पुरोगामी सामाजिक विचारांचे एक सशक्त प्रतीक बनली आहे.

शायस्ता अंबर यांचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नाही. २०१९ मध्ये भारतातील अमेरिकन दूतावास आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना 'इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम अवॉर्ड' आणि 'इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवॉर्ड'साठी नामांकित केले होते. भारतातील अत्यंत प्रभावशाली महिलांमध्येही त्यांचा गौरव झाला आहे. त्यांच्या एका टेड-एक्स (TEDx) भाषणाला लाखो लोकांनी पाहिले. त्या भाषणात त्यांनी देशातील मुस्लिम महिलांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता:

"भारतातील मुस्लिम महिला एका हातात पवित्र कुराण आणि दुसऱ्या हातात भारताचे संविधान घेऊन पुढे चालतील."

हाच त्यांच्या विचारसरणीचा मूळ गाभा आहे. धार्मिक श्रद्धा आणि देशाचा कायदा यामध्ये कोणताही संघर्ष नाही, तर हे दोन्ही मिळून महिलांना अधिक सक्षम बनवतात आणि समाजात त्यांचे स्थान मजबूत करतात, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

जोपर्यंत आपल्या मुली सुशिक्षित होत नाहीत, तोपर्यंत कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही, असे शायस्ता अंबर मानतात. त्यांनी मुस्लिम मुलींसाठी आधुनिक शिक्षण, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा नेहमीच आग्रह धरला आहे. एक सुशिक्षित स्त्री केवळ स्वतः स्वावलंबी बनत नाही, तर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची विचारसरणी बदलून टाकते, असे त्यांचे मत आहे. 

संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण मिळायला हवे, यासाठीही त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. देशातील धोरण ठरवणाऱ्या संस्थांमध्ये जोपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढत नाही, तोपर्यंत महिलांची सुरक्षा आणि विकास यामध्ये मोठा बदल घडून येणार नाही, असे त्या स्पष्ट सांगतात.

आज शायस्ता अंबर या त्यांच्या एका मुलासह आणि दोन मुलींसह लखनौमध्ये राहतात. त्यांच्या या धाडसी आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड अभिमान वाटतो. मनाशी पक्का निश्चय केला आणि हेतू चांगला असेल, तर शतकांपासून चालत आलेल्या सामाजिक भिंतीही पाडता येतात, हेच त्यांचे जीवन आपल्याला शिकवते. स्वतःचे हक्क, आदर आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक भारतीय महिलेचा त्या एक बुलंद चेहरा बनल्या आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter