Ashadhi Wari : जहीर मिर्झांच्या कॅनव्हासवर वारकऱ्यांनी केली रंगांची उधळण

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
कलाकार जहीर मिर्झा यांनी ओपन ईझल उपक्रमातून वारकऱ्यांच्या सुप्त कलागुणांना दिली वाट
कलाकार जहीर मिर्झा यांनी ओपन ईझल उपक्रमातून वारकऱ्यांच्या सुप्त कलागुणांना दिली वाट

 

भक्ती चाळक 

सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत दंग झाला आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये लाखो वारकऱ्यांसोबत एक अवलिया हातात टाळ नव्हे तर रंगाचे ब्रश आणि कॅनव्हास घेऊन चालत होता. 

पांढरे धोतर, शुभ्र कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी आणि कपाळावर गंध लावून जहीर मिर्झा वारीत सहभागी झाले. सहभागापुरते मर्यादित न राहता त्यांनी एक उपक्रम राबवला. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या समोर मोठे कॅनव्हास आणि रंग ठेवले. मग काय वारकऱ्यांनी मिळून चित्रात रंग भरले. जहीर यांनी आपल्या ओपन ईझल (Open Easel) या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाट मोकळी करून दिली.

 
जहीर मिर्झा यांनी ‘आवाज-द-व्हॉईस’ला मुलाखत दिली. ओपन ईझल या संकल्पनेबद्दल बोलताना ते म्हणाले, “ओपन ईझल हे लोकांपर्यंत कला पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. वर्दळीच्या ठिकाणी मी माझा कॅनव्हास उभा करतो आणि लोकांना रंगांद्वारे त्यावर व्यक्त व्हायला लावतो. याच उपक्रमाच्या माध्यमातून मी यंदा महाराष्ट्राचा लोकोत्सव असलेल्या वारीत सहभागी होण्याचं ठरवलं.”  

वारीचा हा अनुभव सांगताना जहीर भावुक झाले. ते म्हणाले, “वारीच्या या उपक्रमाने माझं अंतकरण बदलून टाकलं. वारीत येणारे ते साधे लोक होते. कोणी शेतकरी होतं, कोणी सुतारकाम करणारं होतं, तर कोणाकडे साधी नोकरीही नव्हती. पण सर्वांनी मिळून अत्यंत सुंदर कलाकृती तयार केली. ही सर्व विठू माऊलीचीच कृपा आहे.”

ते पुढे म्हणाले, “वारीतून परत आल्यावर मी घरी बसून तो कॅनव्हास पाहिल्यावर माझे डोळे भरून आले. शेतात राबणाऱ्या या हातांमध्ये एवढी अफाट कला आणि भक्ती असू शकते, हे पाहून मी थक्क झालो.”

सासवडमध्ये वारीच्या दरम्यान त्यांनी हा उपक्रम राबवला. ते सगळे क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. त्यांच्या या व्हिडीओजला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. एक वृद्ध वारकरी महिला रंगकाम करताना विठूनामात दंग झाली आणि चक्क तिच्या डोक्यातून घळाघळा अश्रुच वाहायला लागले. त्यावेळी जहीरही भावूक झाले.

कला हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग 
मूळचे मुंबईचे जहीर मिर्झा प्रसिद्ध ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’चे फाईन आर्टिस्ट आहेत. जाहिरात क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नाव कमावलंय. ‘लिंटास’ आणि 'जेडब्ल्यूटी' यांसारख्या देशातील बलाढ्य जाहिरात संस्थांमध्ये त्यांनी वरिष्ठ पदांवर काम केलंय. इतकंच नाही, तर ते काही काळ दक्षिण-पूर्व आशियाचे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहत होते. 

जहीर यांनी स्वतःची जाहिरात एजन्सीही उभी केली. परंतु काही कारणास्तव त्यांनी ती एका जपानी कंपनीला विकून टाकली. पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅमर सर्वकाही पायाशी असताना वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ब्रँड बनवण्यापेक्षा समाजाला काहीतरी देण्याचं त्यांनी ठरवलं.

जहीर हे स्वतः ज्या कॉलेजमध्ये शिकले, तिथेच त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये ते चित्रकलेचे धडे द्यायला लागले. तिथे आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी काही समाजहिताचे उपक्रम राबवण्याचं ठरवलं.

आजकालची तरुण पिढी सोशल मीडियामध्ये खूप व्यग्र असल्याचं जहीर आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी पाहिलं. हीच बाब ओळखून, सोशल मिडियाचा वापर करून त्यांना अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायचं होतं. आपली कला सर्वांसमोर सादर करायची होती. 

हाच उद्देश डोक्यात ठेवून जहीर यांनी मार्च महिन्यात ‘ओपन ईझल’ नावाचा उपक्रम सुरू केला. सामान्य माणसाने मनात कोणतीही भीती न बाळगता कॅनव्हासवर आवडीचे रंग उधळावेत, हा यामागचा उद्देश होता. त्यांनी हा उपक्रम मुंबई, अहमदाबाद, सुरत, रायपूर, पुणे अशा अनेक शहरांमध्ये राबवला. 
 

झाली कलेशी जवळीक 
जहीर यांच्या लहानपणाची गोष्टही खूप रंजक आहे. त्याकाळी मुलांकडे सायन्स किंवा कॉमर्स घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. पण जहीर त्यांना अभ्यासापेक्षा चित्रकलेची आवड होती. ते म्हणतात, “माझ्या शाळेच्या वह्यांमध्ये कधीच अभ्यासाच्या नोट्स नसायच्या, तिथे फक्त चित्रं असायची. त्यामुळे माझे वडील मला खूप ओरडायचे. मी कधीही एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा दिली नाही. कारण मला कोणाशी स्पर्धा करायची नव्हती. मला फक्त स्वतःच्या आनंदासाठी चित्रं काढायची होती.”

जहीर यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांनी बेळगावमध्ये १० वी आणि १२वीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिथेच दीड-दोन वर्षं नाईलाजाने सायन्सचं शिक्षण घेतलं. पण तिथे त्यांचं मन अजिबात रमेना. शेवटी ते बेळगावहून मुंबईला परत आले. त्यांच्या कौशल्याने त्यांना जे जे कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

जाहिरात क्षेत्रात जहीर यांनी मोठं काम केलं. ‘बजाज आमला’, ‘सर्फ एक्सल’, ‘जेट एअरवेज’ आणि ‘इंडियन नेव्ही’ यांसारख्या मोठ्या ब्रँड्ससाठी त्यांनी जाहिराती केल्या. त्यांच्या जाहिराती खूप गाजल्या. जाहिरात क्षेत्रात गोष्टी सांगण्याची कला खूप महत्त्वाची असते. जहीर यांच्याकडे तीच कल्पकता आहे.
 

‘आर्ट इंटेलिजन्स’वर विश्वास 
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा पगडा आहे. जहीर यांनी या शब्दातील 'आर्टिफिशियल' म्हणजेच कृत्रिम हा भाग खोडून काढला आहे. ते ‘आर्ट इंटेलिजन्स’ या संकल्पनेचा प्रसार करत आहेत. याविषयी ते म्हणतात, “आर्ट इंटेलिजन्स म्हणजेच मानवी बुद्धिमत्ता. ही बुद्धिमत्ता कॉम्प्युटर किंवा मशीनला कधीच मिळणार नाही. इथून पुढे हजारो वर्षांनंतरही मशीन माणसाची जागा घेऊ शकणार नाही. कारण मशीनमध्ये मानवी भावना नसतात.”

जहीर पुढे म्हणतात, “देशात नवनिर्मिती करायची असेल, तर कलेचं शिक्षण गरजेचं आहे. जास्तीत जास्त मुलांना कलेचं शिक्षण देण्याचं माझं ध्येय आहे. मी माझं उर्वरित आयुष्य याच कामासाठी घालवणार आहे.”

देशाच्या भवितव्याबद्दल जहीर म्हणतात,  “ देशाचं भविष्य बदलायचं असेल तर फक्त दोनच गोष्टींवर भर दिला पाहिजे. पहिली म्हणजे आपली शिक्षण पद्धती आणि दुसरी म्हणजे पालकांची मुलांचं संगोपन करण्याची पद्धत. या दोघांकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजं. या दोन गोष्टी बदलल्या, तर सर्वकाही बदलेल.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter