पुरी
ओडिशामधील पुरी येथे भगवान जगन्नाथाची वार्षिक रथयात्रा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पुरीमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात राज्य पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचा (Coast Guard) समावेश आहे. गर्दीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १३,००० पोलीस कर्मचारी, १५ कंपन्या केंद्रीय सशस्त्र दले आणि एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच, समुद्रकिनाऱ्यावर ५०० जीवरक्षक सज्ज ठेवण्यात आले आहेत.
हवामान विभागाने पावसाचा 'रेड अलर्ट' दिला असून, पुरीमध्ये जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत पुरीमध्ये १४३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे ग्रँड रोडवर साचलेले पाणी उपसण्यासाठी विशेष पंपिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून रथ ओढताना कोणतीही अडचण येऊ नये.
गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत देवाची मूर्ती रथात विराजमान करण्याची विधी होईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पुरीच्या गजपती महाराजांच्या परंपरेनुसार रथ ओढण्यास सुरुवात होईल. जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी ही माहिती दिली. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ३०० हून अधिक गाड्या, तर राज्य सरकारने ८०० हून अधिक बसची सोय केली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि अनेक मंत्री रथयात्रेच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.