INDIA-BELGIAN: युरोपीय देशांशी भारताची वाढती भागीदारी; एस. जयशंकर यांनी ब्रसेल्समध्ये घेतल्या महत्त्वपूर्ण बैठका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 h ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रेव्हॉट यांच्यात धोरणात्मक चर्चा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रेव्हॉट यांच्यात धोरणात्मक चर्चा

 

ब्रसेल्स

भारत आणि बेल्जियम यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रसेल्समध्ये बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रेव्हॉट यांच्यासोबत पहिल्या भारत-बेल्जियम धोरणात्मक संवादात (Strategic Dialogue) सह-अध्यक्षपद भूषवले.

या दोन दिवसांच्या दौऱ्यात जयशंकर यांनी संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, औषधनिर्माण (फार्मास्युटिकल), डिजिटल तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर दिला. जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हाने, पुरवठा साखळीतील विविधीकरण आणि जागतिक तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील वाढत्या धोरणात्मक भागीदारीचा उल्लेख करत, जयशंकर यांनी मुक्त व्यापार कराराचे (Free Trade Agreement) महत्त्व अधोरेखित केले. केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता हा करार अधिक व्यापक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यात त्यांनी युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय कमिशनच्या उपाध्यक्षा काजा कॅलास यांच्याशीही भेट घेतली. तसेच, भारताची युरोपशी असलेली वाढती विश्वासार्हता अधोरेखित करण्यासाठी 'भारत-युरोप बिझनेस राउंडटेबल'मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. या भेटींमुळे भविष्यात भारत आणि बेल्जियम यांच्यात अधिक संरचित आणि परिणामकारक भागीदारी निर्माण होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.