नवी दिल्ली
भारत आणि कुवेत यांच्यात शुक्रवारी नवी दिल्लीत एक महत्त्वाची संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक पार पडली. दोन्ही देशांमधील प्रशिक्षण, लष्करी सराव, संरक्षण उद्योग, संशोधन आणि विकास (R&D) यांसारख्या विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यावर या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली आहे.
भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीची (JDC) ही पहिलीच बैठक होती. डिसेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्य कराराच्या (MoU) उद्दिष्टांच्या अंमलबजावणीच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात दिली. संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि कुवेती शिष्टमंडळाचे ब्रिगेडियर जनरल राएद अलसकरन यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
कुवेती शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्या. तसेच, भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत संभाव्य सहकार्याच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत आणि कुवेतचे संबंध पारंपरिकदृष्ट्या अत्यंत जिव्हाळ्याचे आणि ऐतिहासिक राहले असून, २०२४ मध्ये या धोरणात्मक भागीदारीला अधिक व्यापक रूप देण्यात आले होते.