भारतीय लष्कराने संरक्षण दलांसाठी सुरू केला 'भारत राईस' उपक्रम; धान्याचा दर्जा उंचावण्याचा उद्देश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 45 m ago
भारत राईसची पाहणी करताना राजनाथ सिंग
भारत राईसची पाहणी करताना राजनाथ सिंग

 

नवी दिल्ली 

भारतीय लष्कराने सोमवारी संरक्षण दलांसाठी उच्च दर्जाचा 'भारत राईस' (Bharat Rice) अधिकृतपणे लॉन्च केला आहे. जवानांच्या रेशनचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'डायरॅगोरेट जनरल ऑफ सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट'च्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात जवानांच्या सततच्या फीडबॅकचा विचार करण्यात आला आहे. ठरवून दिलेल्या संरक्षण मानकांनुसार या तांदळाची मिलिंग केली जाणार असून, २०२६-२७ या आर्थिक वर्षात 'नाफेड' (NAFED) मार्फत पुरवठा केला जाईल.

गुणवत्ता नियंत्रण आणि थेट पुरवठा

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा तांदूळ कठोर गुणवत्ता नियंत्रण निकषांमधून जाईल. यात बाहेरील घटक किंवा भेसळ असणार नाही, तसेच तुटलेले, खराब किंवा रंग उडालेले दाणे किमान असतील. या उपक्रमांतर्गत भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांच्यात एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारामुळे हा उच्च दर्जाचा तांदूळ लडाख आणि ईशान्येकडील दुर्गम भागातील लष्करी सप्लाय डेपोपर्यंत थेट पोहोचवला जाईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

या प्रसंगी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी देखील उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या संबोधनात 'भारत राईस' हा शेतकरांच्या शेतापासून जवानांच्या ताटापर्यंतचा विश्वासाचा सेतू असल्याचे म्हटले. आधुनिक युद्धकाळात केवळ शस्त्रे आणि तंत्रज्ञानच नाही, तर रसद पुरवठा (Logistics) देखील युद्धाची खरी ताकद असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. 'ऑपरेशन सिंदूर'च्या धड्यांनुसार लष्कराची रसद यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.