पुणे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भाचे लिंग निदान करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आयुर्वेदिक डॉक्टरासह दोन जणांना अटक केली असून, स्त्री भ्रूणहत्येच्या उद्देशाने चालणारे हे 'रेफरल' नेटवर्क मोडीत काढण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अवघा १२ वी पास असून, तो मोबाईल अॅप्लिकेशनला जोडलेल्या चिनी बनावटीच्या पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशीनच्या साहाय्याने हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बेकायदेशीर लिंग निदानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास चक्रे फिरवली. अन्नसाहेब गिरी (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना तो गर्भलिंग निदानाचे चाचण्या करत होता.
मोबाईल अॅप आणि चिनी मशीनचा वापर
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अन्नसाहेब गिरी हा २०२४ पासून या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होता. तो डॉक्टर नसून केवळ १२ वी पर्यंत शिकलेला आहे. त्याने बी. फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता, मात्र पहिल्याच वर्षी नापास झाल्याने त्याने शिक्षण सोडले होते. गिरी हा ब्लूटुथद्वारे मोबाईल अॅप्लिकेशनशी जोडलेल्या एका चिनी बनावटीच्या पोर्टेबल अल्ट्रासाऊंड उपकरणाचा वापर करून लिंग निदान करायचा. पोलिसांनी हे मशीन जप्त केले आहे.
हा आरोपी प्रत्येक चाचणीसाठी ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारत असे. चाचणीमध्ये मुलगी असल्याचे स्पष्ट झाल्यास गर्भपातासाठी महिलांना नेटवर्कशी जोडलेल्या इतर डॉक्टरांकडे पाठवले जात होते. या प्रकरणात वाघोली येथील अतुल जाधव नावाच्या बीएएमएस (BAMS) पदवीधारक डॉक्टरालाही पोलिसांनी अटक केली असून, इतर दोन डॉक्टर सध्या फरार आहेत.
रॅकेटमध्ये 'रेफरल' सिस्टीमचा वापर
तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे रॅकेट अत्यंत गुप्त पद्धतीने 'रेफरल' सिस्टीमवर चालत होते. रुग्णांना आधी लिंग निदानासाठी गिरीकडे पाठवले जायचे आणि त्यानंतर गर्भपातास तयार असलेल्या डॉक्टरांकडे त्यांची रवानगी केली जायची. कमालीची गुप्तता पाळली गेल्यामुळे नेमक्या किती महिलांची चाचणी झाली आणि किती बेकायदेशीर गर्भपात झाले, याचा आकडा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
आरोपी गिरीने दरमहा १५ ते २० महिलांची तपासणी करत असल्याचा दावा केला असला, तरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात गिरी दरमहा ३० ते ५० चाचण्या करत असल्याचे समोर आले आहे. गिरीला अल्ट्रासाऊंड मशीन पुरवणाऱ्या नरेंद्र ठाकरे नावाच्या आणखी एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर संशयित डॉक्टर आणि दलालांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. या आरोपींविरोधात पीसीपीएनडीटी (PC&PNDT) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.