मुंबईमध्ये एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका अज्ञात सायबर चोरट्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाचा मोबाईल फोन हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ९५ हजार ६६८ रुपये लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास सुरू केला आहे. फसवणूक झालेले जवान मुंबईतील माहिम पोलीस कॉलनी येथे असलेल्या सीआयएसएफ कार्यालयात कार्यरत आहेत.
शनिवारी संबंधित जवानाला त्यांचा मोबाईल फोन अचानक आपोआप रीसेट होत असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर फोनमधील इन्स्टॉल केलेले सर्व अॅप्लिकेशन्स देखील आपोआप डिलीट होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळाने फोन रिस्टार्ट झाला आणि नेहमीसारखा सुरू झाला. जवानाने याला तांत्रिक बिघाड समजून फोनपे (PhonePe) अॅप्लिकेशन पुन्हा डाऊनलोड केले.
मोबाईल हॅक करून ऑनलाईन व्यवहार
जवानाने जेव्हा बँक खात्यातील शिल्लक रक्कम (बॅलन्स) तपासली, तेव्हा त्यांना खात्यातून ९५ हजार ६६८ रुपये परस्पर डेबिट झाल्याचे दिसून आले. त्यांनी कोणतीही परवानगी किंवा ओटीपी शेअर केला नसतानाही ही रक्कम वजा झाली होती. हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने बँकेत धाव घेऊन आपले खाते ब्लॉक करण्याची विनंती केली.
बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवानाचा मोबाईल फोन हॅकर्सनी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता. मोबाईलचा अॅक्सेस मिळवून सायबर चोरट्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली होती. जवानाने तात्काळ सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधला आणि त्यानंतर माहिम पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
पोलीस आणि सायबर सेलचा तपास सुरू
माहिम पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांनुसार एफआयआर (FIR) नोंदवला आहे. डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांच्या तांत्रिक तपशिलाच्या आधारे पोलीस या सायबर टोळीचा शोध घेत आहेत.