सानिया अंजुम
काही नेतृत्व आपल्या व्यक्तिमत्वामुळे इतरांना प्रभावित करतात, तर काही आपल्या विचारांच्या ठामपणामुळे. नजमा फारुकी या दुसऱ्या प्रकारच्या दुर्मिळ नेतृत्वांपैकी एक आहेत. त्या अशा पोलीस अधिकारी आहेत, ज्यांच्या अधिकाराचा पाया संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणावर आधारलेला आहे. शक्ती ही जबाबदारीपासून कधीच वेगळी असू शकत नाही आणि जनसेवा ही माणुसकीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या नेतृत्वाचे त्या एक उत्तम उदाहरण आहेत.
नजमा यांचा पोलीस दलातील प्रवास हा त्यांनी वर्दी परिधान करण्याच्या खूप आधीच सुरू झाला होता. त्यांच्या घरच्या वातावरणानेच त्यांच्यावर हे संस्कार केले. नजमा त्यांचे वडील, ज्यांना त्या एक द्रष्टा आणि दिग्गज मानतात, त्यांना बघतच मोठ्या झाल्या. त्यांच्या वडिलांच्या गोष्टी, अनुभव आणि मूल्यांनी नजमा यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कर्तव्याची जाणीव घडवली. वडिलांसोबतच त्यांची आई नजमा यांचा मोठा आधार बनली.
आईबद्दल बोलताना त्या म्हणतात, "माझ्या आईने मला नेहमी जमिनीवर पाय ठेवून जगायला आणि नम्र राहायला शिकवले. तिची सकारात्मक ऊर्जा, आंतरिक शक्ती आणि माझ्यावर असलेला अढळ विश्वास हाच माझ्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत राहिला आहे."
लहानपणापासूनच नजमा खूप विचारशील आणि जिज्ञासू होत्या. त्यांना असे प्रश्न पडायचे जे सामान्यतः मुलांना पडत नाहीत. असाच एक प्रश्न त्यांच्या मनात अनेक वर्षे घोळत होता, "लोकांना नाव का दिले जाते आणि त्या नावाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो?" 'नजमा' या अरबी शब्दाचा अर्थ आहे 'तारा', जो तेज आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. पण त्यांच्या वडिलांसाठी या शब्दाचा अर्थ खूप मोठी जबाबदारी होती. "योग्य मार्गदर्शनासाठी आपण आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम असायला हवे," असे ते नेहमी सांगायचे.
या विचाराने नजमा यांना खूप खोलवर विचार करायला लावले. त्या स्वतःशीच म्हणायच्या, "मार्गदर्शन ही गोष्ट मला टोचत होती. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये तशी पात्रता आणि कर्तृत्व सिद्ध करत नाही, तोपर्यंत कोणी तुमचे अनुसरण का करेल?" हाच प्रश्न त्यांच्या व्यावसायिक जीवनाला आकार देणारी एक अदृश्य शक्ती बनला.
नजमा फारुकी यांच्यासाठी पोलीस सेवा म्हणजे सत्तेचे प्रदर्शन नाही. ते विश्वासाचे नाते आहे. त्या म्हणतात, "जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याबद्दल, विशेषतः पोलीस अधिकाऱ्याबद्दल बोलतो, तेव्हा लोकांना वाटते की हे शक्तीचे पद आहे. पण माझ्या मते, हा विश्वासाने दिलेला अधिकार आहे." शासन आणि जनता यांमधील त्या स्वतःला एक दुवा मानतात. कायद्याच्या माध्यमातून वंचितांना संधी, संरक्षण आणि सक्षमीकरण मिळवून देणे, हे त्यांचे ध्येय आहे. "येथेच मी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करू शकते. स्वतःवर विश्वास ठेवण्याची एक नवी लाट निर्माण करणे, हेच माझे काम आहे," असे त्या सांगतात.
वर्दी असो वा नसो, त्यांची नैतिक मूल्ये कधीच बदलत नाहीत. ठाम नैतिक तत्त्वे, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, नैतिक पोलीस सेवा, समर्पणाची भावना आणि व्यावसायिक आचरण या गोष्टींशी त्या कधीच तडजोड करत नाहीत. हीच मूल्ये त्यांना एक पोलीस अधिकारी म्हणून घडवतात आणि कर्तव्यावर असताना किंवा नसतानाही त्यांचे निर्णय ठरवतात.
पोलीस दल हे श्रेणीबद्ध पद्धतीने काम करत असले, तरी नजमा मात्र सांघिक कार्य आणि संवादावर भर देतात. शिस्त हा पोलीस दलाचा कणा आहे, पण त्यामागची समज हा त्याचा आत्मा आहे, असे त्या मानतात. "पोलीस दलाचे काम हे नेहमीच एक टीम म्हणून केले जाते," असे त्या सांगतात. एखाद्या मोहिमेपूर्वी आणि नंतर त्या आपल्या टीमसोबत सविस्तर चर्चा करतात. केवळ आदेश देण्यापेक्षा त्या संवादाला महत्त्व देतात.
त्यांच्या मते, "जेव्हा टीमला हे समजते की नियम हे काम सोपे करण्यासाठी बनवले आहेत, तेव्हा लोक स्वतःहून त्यांचे पालन करतात." शिक्षा करणे हा त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय असतो. त्या म्हणतात की, "शिक्षा देण्यापेक्षा चुका सुधारण्याचा दृष्टिकोन अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन असतो." सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेत्याने स्वतः पुढाकार घेऊन काम केले पाहिजे आणि नियमांचे काटेकोर पालन करून आदर्श घालून दिला पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.
त्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा अनुभव त्यांच्या प्रोबेशनरी पोस्टिंगच्या काळात टी एस हल्ली येथे आला. तोपर्यंत नजमा कधीही पोलीस स्टेशनमध्ये गेल्या नव्हत्या. चित्रपट आणि लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या मनात पोलीस स्टेशनबद्दल एक वेगळीच प्रतिमा होती. पण जेव्हा त्यांचा प्रत्यक्ष लोकांशी आणि त्यांच्या समस्यांशी सामना झाला, तेव्हा ही प्रतिमा लगेच बदलली. "लोकांशी, त्यांच्या समस्यांशी आणि प्रलंबित केसेसमुळे लोकांच्या मनात पोलीस स्टेशनबद्दल असलेली भीती, या सर्वांचा माझा तो पहिलाच जवळून आलेला संबंध होता."
त्यावेळी एक कठीण केस त्यांच्याकडे आली. एका बेपत्ता मुलीचे पालक तक्रार नोंदवायला घाबरत होते. पुढचे ५२ तास नजमा आणि त्यांच्या टीमने अहोरात्र कष्ट केले. त्यांनी त्या पालकांचा विश्वास जिंकला, मुलीचा शोध घेतला आणि तिला सुखरूप तिच्या कुटुंबाकडे सोपवले.
या अनुभवाबद्दल त्या म्हणतात, "या एका घटनेने मला लोकसंपर्क, संवेदनशीलता, सांघिक कार्य, निर्णयक्षमता, समस्या निवारण आणि उत्तरदायित्व या सर्व गोष्टींचा अर्थ समजावला. त्या क्षणी मला मिळालेले समाधान शब्दातीत होते." या घटनेने त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आणि त्यांना पोलीस सेवेतील सर्वात मोठा धडा मिळाला.
जनसेवा ही नजमा यांच्यासाठी एक वैयक्तिक बांधिलकी आहे. लोकांशी संवाद साधणे, जमिनीवरची परिस्थिती समजून घेणे, विश्वास निर्माण करणे आणि समस्या उद्भवण्याआधीच त्यावर उपाय शोधणे, यालाच त्या खरी सेवा मानतात. त्यांच्या मते, समाजाला केवळ तात्पुरत्या मदतीची नाही, तर सततच्या मार्गदर्शनाची गरज आहे. "मुळ कारणांचा शोध घेणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःच्या कामात सुधारणा करणे, ही आजची खरी गरज आहे," असे त्या म्हणतात. अभ्यासू लोक आणि सामाजिक नेते एकत्र आले, तर समाजात कायमस्वरूपी बदल घडू शकतो, अशी त्यांची धारणा आहे.
व्यावसायिक जबाबदाऱ्यांमधून वेळ मिळाल्यावर नजमा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे पसंत करतात. त्या म्हणतात, "जेव्हा मी ड्युटीवर नसते, तेव्हा माझे मन माझ्या कुटुंबात रमते." त्या स्वतःचे विचार डायरीत लिहितात, ज्यामुळे त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो.
व्यायाम आणि योगासने करून त्या स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवतात, ज्यामुळे त्यांना दररोज नव्या उमेदीने काम करण्याची ताकद मिळते. विद्यार्थ्यांना भेटणे, त्यांना सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि रस्ते सुरक्षा याबद्दल जागरूक करणे, यात त्यांना खूप आनंद मिळतो. या माध्यमातून त्या एका अधिकाऱ्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या मार्गदर्शक आणि मित्र बनतात.
नजमा फारुकी यांचा हा प्रवास एक मोठे सत्य अधोरेखित करतो. अधिकार गावण्यासाठी आरडाओरडा करण्याची गरज नसते. जेव्हा तुमचे अधिकार विश्वास, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणावर आधारलेले असतात, तेव्हा ते समाजात मोठा बदल घडवू शकतात. त्यांच्या हातात पोलीस सेवा ही केवळ कायदा राबवण्याचे साधन राहिलेली नाही, तर ती विवेकाने केलेले नेतृत्व आणि उद्देशपूर्ण सेवा बनली आहे.