राजस्थान हा प्रदेश नेहमीच भव्य किल्ले, राजवाडे आणि समृद्ध परंपरांसाठी ओळखला जातो. मात्र, सध्या या राज्यात एक मौन क्रांती घडत आहे. राजस्थानमधील स्त्रिया आपलं ज्ञान, करुणा आणि जिद्दीच्या जोरावर नेतृत्वाची नवी व्याख्या लिहीत आहेत. वैद्यकीय क्षेत्र, कायदा, वन्यजीव संरक्षण, वारसा जतन, पत्रकारिता, समाजसेवा आणि सामाजिक सुधारणा या सर्व क्षेत्रांमध्ये या १० असाधारण महिलांनी रूढी-परंपरांची बंधने मोडून काढली आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. खरी प्रगती ही केवळ स्वतःच्या यशावर अवलंबून नसते, तर इतरांसाठी संधी निर्माण करण्याच्या ध्येयावर उभी असते, हेच या महिलांच्या कर्तृत्वातून सिद्ध होते.
डॉ. शाइस्ता अंजुम या कौटुंबिक पाठिंबा आणि शिक्षणाच्या ताकदीचे उत्तम उदाहरण आहेत. आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका बिडी कामगाराची ही मुलगी. आर्थिक अडचणींवर मात करत शाइस्ता यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून नाव कमावले. पतीचे प्रोत्साहन आणि सासूची मोलाची साथ त्यांना मिळाली. सासूने स्वतःच्या नातीचा सांभाळ करत शाइस्ता यांच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला. दोन असाधारण महिलांच्या त्यागाने आणि बलिदानाने शाइस्ता यांचे स्वतःचे स्वप्न आणि त्यांच्या कुटुंबाची इच्छा पूर्ण झाली.
'सर्जनिक्स हेल्थकेअर'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) फिरदौस खान यांनी लहानपणाच्या संघर्षाचे रूपांतर सामान्य माणसांसाठी आरोग्य सेवा सुलभ करण्याच्या ध्येयात केले. अजमेरमध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हाताने बनवलेल्या वस्तू विकण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांनी रुग्णांना केंद्रस्थानी ठेवणारे एक प्रगत व्यासपीठ उभारले आहे. त्यांचा हा उद्योजकीय प्रवास सहानुभूती, नावीन्य आणि वैद्यकीय उपचार पारदर्शक तसेच सर्वांना परवडणारे असावेत या विश्वासाचे प्रतीक आहे.
भारताच्या कला वारशाचे रक्षण करण्यात मैमुना नर्गिस यांनी मोलाचे योगदान दिले आहे. देशातील आघाडीच्या कला संरक्षकांपैकी त्या एक आहेत. मुघल काळातील दुर्मिळ हस्तलिखिते आणि शतके जुन्या कुराण ग्रंथांचे पुनरुज्जीवन करण्यापासून ते मंदिरे, राजवाडे, भित्तिचित्रे आणि संग्रहालयांमधील दुर्मिळ वस्तूंचे जतन करण्यापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी अर्पण केले आहे. इतिहास घडवण्याइतकेच इतिहासाचे जतन करणे महत्त्वाचे असते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
जयपूरच्या न्यायालयांमध्ये महिला वकिलांची संख्या अत्यंत विरळ असताना ॲडव्होकेट निगार सुलताना यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. वडिलांच्या वारशातून प्रेरणा घेत त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'पहल एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट सोसायटी'च्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. न्याय केवळ न्यायालयाच्या भिंतींपुरता मर्यादित न राहता तो वर्ग खोल्यांपर्यंत आणि समाजात पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
निशांत हुसेन यांनी तीन दशकांहून अधिक काळ समुपदेशन, मध्यस्थी आणि समर्थनाच्या माध्यमातून अनेक विस्कटलेली कुटुंबे पुन्हा सावरली आहेत. राजस्थानच्या पहिल्या महिला काझींपैकी त्या एक आहेत. महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी अविरत लढा दिला आहे. बालविवाह आणि झटपट तीन तलाकची पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. संवाद, सन्मान आणि न्यायामुळे कुटुंबे आणि समाज अधिक मजबूत होतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
राजस्थानमधील वन्यजीव संरक्षणात प्राध्यापक फातिमा सुलताना यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या संशोधनामुळे हाडोती भागातील वाघांचे मार्ग पुन्हा जिवंत होण्यास मदत झाली. त्यांच्या वैज्ञानिक अभ्यासामुळे 'मुकुंदरा हिल्स' आणि 'रामगढ विषधारी' या वाघ प्रकल्पांची पायाभरणी झाली. तरुण पिढीला वन्यजीव संरक्षण ही केवळ शास्त्रीय जबाबदारी नसून ते एक सामाजिक कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.
आपत्तीग्रस्तांना मदत करणे, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना मार्गदर्शन करणे आणि पर्यावरणाची जाणीव जागृती करणे, या सर्व कामांमध्ये रुबी खान नेहमी पुढे राहिल्या आहेत. त्यांनी ४,००० किलोमीटरची 'भारत यात्रा' पायाने चालून पूर्ण केली. सामाजिक कार्यकर्त्या, रेसर, लेखिका आणि शिक्षिका असलेल्या रुबी खान यांनी दाखवून दिले की, नेतृत्व पदव्यांवरून ठरत नाही तर तुम्ही किती लोकांचे आयुष्य बदलता यावरून ठरते.
शबाना डागर या ५०० वर्षे जुन्या 'डागर घराण्या'च्या ध्रुपद परंपरेचे जतन करण्याचे काम करत आहेत. जयपूरमधील 'डागर आर्काइव्ह'च्या माध्यमातून त्यांनी दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन वाद्ये आणि शतकांची संगीत परंपरा सुरक्षित ठेवली आहे. भारतातील सर्वात जुनी शास्त्रीय संगीत परंपरा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, याची काळजी त्या घेत आहेत.
पत्रकार आणि उर्दू लेखिका झीनत कैफ यांनी सामाजिक बंधनांपुढे हार मानली नाही. बालपणीची बंधने, व्यावसायिक भेदभाव आणि वैयक्तिक अडचणींवर मात करत त्या राजस्थानमधील पहिल्या मुस्लिम महिला पत्रकारांपैकी एक बनल्या. निर्भीड पत्रकारिता आणि उत्कृष्ट साहित्याच्या जोरावर त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. स्वतंत्र विचारांशी त्या नेहमी प्रामाणिक राहिल्या.
या सर्व प्रवासात फर्हा हुसेन यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गुन्हेगारी प्रकरणांच्या वकील ते 'इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस' (आयआरएस) अधिकारी असा त्यांचा प्रवास शिक्षण आणि जिद्दीची ताकद दाखवून देतो. युपीएससी नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण देशात २६७ वा क्रमांक मिळवून त्यांनी यश संपादन केले. गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक सेवेच्या जोरावर देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांसाठी त्या एक आदर्श बनल्या आहेत.
या १० महिला आधुनिक राजस्थानचे प्रतिनिधीत्व करतात. यामध्ये डॉक्टर, उद्योजक, पर्यावरणतज्ज्ञ, वकील, समुपदेशक, शिक्षिका, कलाकार, पत्रकार आणि सनदी अधिकारी यांचा समावेश आहे. परिस्थिती नव्हे तर धाडस बदल घडवून आणते, हाच संदेश या महिलांच्या जीवनप्रवासातून मिळतो. महिलांना कोणतीही बंधने नसलेली स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले, तर त्या अधिक संवेदनशील, समावेशक आणि प्रगत समाजाच्या शिल्पकार बनतात.