आरिफुल इस्लाम
दररोज लाखो लोक टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनवर प्रतिभावान कलाकारांचं कौतुक करत असतात. पण त्यातल्या संस्मरणीय फोटोंच्या मागे कुशल फोटोग्राफर असतो. त्याचं काम मात्र बऱ्याचदा दुर्लक्षित राहतं. आसाममधले फोटो जर्नलिस्ट हाफिज अहमद यांनी ही कला पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचं काम केलं आहे. त्यांच्या एका फोटोला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
हाफिज अहमद यांनी टिपलेल्या एका मोहक फोटोने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) वर्षातल्या नऊ सर्वात लक्षवेधी फोटोग्राफ्सपैकी दुसरा सर्वोत्कृष्ट फोटोग्राफ म्हणून याची निवड केली आहे. यामुळे आसामच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाकडेही जगाचं लक्ष गेलं आहे.
हा फोटोग्राफ १६ जानेवारी २०२६ रोजी गुवाहाटी येथील सरुसजाईमधील अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलात ऐतिहासिक बगुरुम्बा नृत्याच्या अंतिम तालमीदरम्यान टिपण्यात आला होता. 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या एक दिवस आधी ही तालीम पार पडली होती.
१७ जानेवारीला बोडो समुदायाच्या १०,००० हून अधिक कलाकारांनी सरुसजाई स्टेडियमवर पारंपारिक बगुरुम्बा नृत्य सादर केलं. त्यांनी "सर्वात मोठे बगुरुम्बा लोकनृत्य" म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. या नेत्रदीपक सादरीकरणात आसाममधील २३ जिल्ह्यांसह पश्चिम बंगाल आणि नेपाळमधील कलाकारांनी सहभाग घेतला होता. सर्व कलाकारांनी 'दोखोना' हा पारंपारिक पोषाख परिधान केला होता.
"बटरफ्लाय डान्स" म्हणून लोकप्रिय असलेलं बगुरुम्बा हे बोडो लोकांच्या महान लोकपरंपरेपैकी एक आहे. हे नृत्य पारंपारिकरित्या 'ब्विसागु' या वसंतोत्सवादरम्यान सादर केलं जातं. हे नृत्य निसर्ग, वाहत्या नद्या, भिरभिरणारी फुलपाखरं आणि नैसर्गिक जगतातील सुसंवाद यांचा उत्सव साजरा करतं.

"बगुरुम्बा ध्वौ २०२६" या अधिकृत नावाने ओळखला जाणारा हा विक्रम प्रस्थापित करणारा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. आसामचा मूळ सांस्कृतिक वारसा आणि 'बोडो शांतता करारा'नंतर निर्माण झालेल्या एकतेचं सशक्त प्रदर्शन म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेलं.
हा फोटोग्राफ टिपण्याच्या क्षणाची आठवण सांगताना हाफिज अहमद 'आवाज-द-व्हॉइस आसाम'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी अंतिम तालमीदरम्यान हा फोटो काढला आणि माझ्या नेहमीच्या कामाप्रमाणे तो एजन्सीजना पाठवला. त्या वेळी, या छायाचित्राला एवढी मोठी ओळख मिळेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. नंतर मला जाणवलं, हा फोटो जगप्रसिद्ध ॲबस्ट्रॅक्ट कलाकार पिएत मोंड्रियन यांच्या शैलीशी कमालीचं साम्य दाखवणारा आहे. मात्र जेव्हा मी हा फोटो काढला, तेव्हा माझं लक्ष बगुरुम्बा नृत्याचं सौंदर्य टिपण्यावरच केंद्रित होतं.”
अहमद यांनी हा फोटो अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलाच्या गॅलरीच्या वरून एका मोक्याच्या ठिकाणाहून टिपला आहे.
ते पुढे म्हणाले, “मी 'झुमा प्रेस' या आघाडीच्या अमेरिकन फोटो एजन्सीसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. इतर अनेक फोटोग्राफ्सप्रमाणेच, मी हा फोटो जानेवारीमध्ये त्यांना पाठवला होता. नंतर मला समजलं, बीबीसीने विविध आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडून फोटोग्राफ्स मिळवले होते.”
बीबीसीकडून ही ओळख मिळाल्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाच्या संदेशांचा वर्षाव झाला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या कार्यालयानेही त्यांचं अभिनंदन केलं.
कृतज्ञता व्यक्त करताना अहमद म्हणाले, “मी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचा आभारी आहे. अशा सुंदर कार्यक्रमांद्वारे ते आसामी संस्कृती जागतिक स्तरावर नेण्यास मदत करत आहेत. या उपक्रमांमुळेच बिहू, झुमुर आणि बगुरुम्बा यांसारख्या सांस्कृतिक परंपरा जगभरात परिचित होत आहेत. हा कार्यक्रम नसता, तर मला असा फोटो काढण्याची संधी कधीच मिळाली नसती. बगुरुम्बाचं सादरीकरण थक्क करणारं होतं आणि असं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आसाम सरकारचे आभार मानतो.”
हाफिज अहमद यांचा फोटोग्राफीतील प्रवास न्यूज फोटोग्राफीच्या आवडीतून सुरू झाला. त्यांनी आसाममधील 'द सेंटिनेल' या आघाडीच्या वृत्तपत्रातून करिअरची सुरुवात केली. तिथूनच त्यांनी फोटो जर्नलिझमच्या क्षेत्रात प्रवेश केला.
आज ते अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी फ्रीलान्स वार्ताहर म्हणून काम करतात. ते आसाम आणि ईशान्य भारतातून नियमितपणे फोटोग्राफ्स पुरवतात. त्यांचं काम झुमा प्रेस, रॉयटर्स आणि अनादोलु एजन्सी यांसारख्या संस्थांनी प्रसिद्ध केलं आहे. याशिवाय ते गुवाहाटी इथून भारताची प्रमुख राष्ट्रीय वृत्तसंस्था 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'ला (PTI) नियमितपणे फोटोग्राफ्स पाठवतात.
आपल्या व्यवसायातील आव्हानांबद्दल बोलताना अहमद म्हणाले, “न्यूज फोटोग्राफीमध्ये अनेक आव्हानं असतात. इतर प्रकारच्या फोटोग्राफ्सप्रमाणे आम्ही योग्य वेळेची वाट पाहू शकत नाही. घटना अचानक घडतात आणि आपण नेहमी तयार असलं पाहिजे. मुसळधार पाऊस, पूर, वादळं, भूकंप, अपघात किंवा इतर कोणत्याही आपत्ती असोत, न्यूज फोटोग्राफरला त्वरित प्रतिसाद द्यावा लागतो. हा एक आव्हानात्मक व्यवसाय आहे. यासाठी चोवीस तास समर्पणाची गरज असते.”
गेल्या काही वर्षांत त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. अगदी अलीकडे, गुवाहाटी येथील 'दिसपूर प्रेस क्लब'ने त्यांच्या स्थापना दिनाच्या समारंभात त्यांचा सन्मान केला. असं असलं तरी, ओळख मिळवणं हा आपला मुख्य हेतू कधीच नव्हता, असं अहमद आवर्जून सांगतात.
ते म्हणाले, “मी पुरस्कार किंवा सन्मानांसाठी काम करत नाही. मला फक्त फोटोग्राफीची आवड आहे आणि मी नेहमीच अर्थपूर्ण फोटो तयार करण्याचा प्रयत्न करतो. बीबीसीकडून मिळालेली ही पावती अगदीच अनपेक्षित होती. अशा प्रकारच्या कौतुकामुळे मला भविष्यात आणखी कष्ट करण्याची आणि अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.”
या आंतरराष्ट्रीय स्तुतीमुळे बगुरुम्बा नृत्याकडेही जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. गुवाहाटीमध्ये बोडो समुदायाच्या सर्वात मोठ्या बगुरुम्बा नृत्य सादरीकरणासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नादरम्यान हे छायाचित्र टिपण्यात आलं होतं, अशी नोंद बीबीसीने या फोटोग्राफच्या वर्णनात केली आहे. वरून पाहिले असता, नर्तक एका वाहत्या, रंगीबेरंगी पॅटर्नसारखे दिसत होते. यातून एक दृश्यमान आणि आश्चर्यकारक ॲबस्ट्रॅक्ट रचना तयार झाली होती.
पूर्व आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील बेनेनाखोवा हे हाफिज अहमद यांचं मूळ गाव आहे. २०१२ मध्ये त्यांनी लालमाटी, गुवाहाटी येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आंत्रप्रेन्योरशिप'मधून फोटोग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी 'कृष्णकांत हांडिक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी'मधून पत्रकारितेची पदवी मिळवली.
तेव्हापासून ते मीडियामध्ये सक्रियपणे काम करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना ते फोटोग्राफ्स पुरवतात. त्यांचे अनेक फोटोग्राफ्स आघाडीच्या जागतिक मीडिया आउटलेट्समध्ये झळकले आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी, रॅट-होल मायनिंगचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या एका फोटोग्राफ्सने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. हे फोटोग्राफ्स त्यांच्या वैयक्तिक आवडीच्या फोटोग्राफ्सपैकी एक आहेत.
आता गुवाहाटीमध्ये स्थायिक झालेले हाफिज अहमद व्यवसाय आणि आवड म्हणून फोटोग्राफीची जोपासना करत आहेत. आपल्या कलेशी एकनिष्ठ असलेले अहमद एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतात; की ‘एक प्रभावी छायाचित्र एकाही शब्दाचा वापर न करता जगभर असंख्य कथा आणि संदेश पोहोचवू शकते’.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -