रामपूर
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील मोहम्मद अली जौहर विद्यापीठाच्या काही इमारती पाडण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन 'तात्पुरते' स्थगित केले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
मोरादाबादच्या विभागीय आयुक्तांच्या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. रामपूर विकास प्राधिकरणाने (RDA) विद्यापीठाच्या ४० पैकी ३८ इमारती विनापरवाना बांधल्या गेल्याचे कारण देत १५ जुलै रोजी पाडण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन सुरू केले होते. मात्र, मोरादाबादच्या विभागीय आयुक्तांच्या न्यायालयाने प्रकरणावरील अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रस्तावित पाडकामावर अंतरिम स्थगिती दिली आहे.
विभागीय आयुक्त अञनेय कुमार सिंह यांनी स्पष्ट केले की, खबरदारीचा उपाय म्हणून हा अंतरिम आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी सोमवारी उशिरा विद्यापीठाला भेट देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना मिठाई वाटली. विद्यापीठावर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला मिळालेली स्थगिती हा विद्यार्थ्यांचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जौहर विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी मंत्री आझम खान यांच्यावरील राजकीय रोषाची किंमत विद्यापीठाला चुकवावी लागू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.