बेइजिंगल
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सकाळी नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, या परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ खंडानंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची माहिती देताना प्रवक्ता माओ निंग यांनी सांगितले की, चीन आणि भारत यांनी आपल्या नेत्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली द्विपक्षीय संबंधांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. लडाख संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लाहकार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत सीमा प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली होती.
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या परिषदेत सामायिक सुरक्षा आणि संवादावर भर दिला जाणार असल्याचे बीजिंगने स्पष्ट केले आहे. या परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह ११ सदस्य देशांचे प्रमुख सहभागी होत आहेत. भारताचे यजमानपद असलेल्या या परिषदेच्या यशस्वी समाप्तीनंतर चीनकडे ब्रिक्सचे आगामी अध्यक्षपद सुसविण्यात येणार आहे.