"परिस्थिती कितीही गरिबीची असू दे, जर उराशी बाळगलेली स्वप्नं मोठी असतील आणि त्यासाठी जिवापाड मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळतं." हे वाक्य उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या मोहम्मद सुहैलने अगदी खरं करून दाखवलं आहे. दिवसा वडिलांचा ई-रिक्षा चालवून घराचा गाडा हाकणाऱ्या सुहैलने रात्री जागून अभ्यास केला आणि देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या 'NEET UG' परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात चक्क ६०९ गुण मिळवले आहेत! सुहैलच्या या यशाने आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून, त्याची ही संघर्षगाथा देशभरात एक मोठी प्रेरणा बनली आहे.
ज्या घरात आजवर कुणी १२ वी च्या पुढे शिकलं नाही, तिथला पोरगा आता थेट डॉक्टर होणार आहे! कसे मिळवले सुहैलने हे यश? जाणून घेऊया त्याची ही भारावून टाकणारी गोष्ट.
डॉक्टर होणं हे आईचं स्वप्न होतं!
सुहैल एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. तो सांगतो की, "डॉक्टर होणं हे माझं नाही, तर माझ्या आईचं स्वप्न होतं. तिचा माझ्यावर असलेला विश्वासच माझी ताकद बनला." १२ वी नंतर सुहैल आणि त्याच्या भावाला पुढे शिकायचं होतं, पण घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. दोघांचाही शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अशा वेळी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सुहैलने दिवसा वडिलांची ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि रात्री तो अभ्यासाला बसायचा.
'नीट' (NEET) म्हणजे काय, हेच माहिती नव्हतं!
सुरुवातीला सुहैलला 'NEET' परीक्षा काय असते, याची काहीच कल्पना नव्हती. एका मित्राने त्याला याबद्दल सांगितलं आणि हेही समजावून सांगितलं की ही परीक्षा पास झाल्यावर खूप कमी पैशांत सरकारी कॉलेजमधून MBBS करता येतं. त्यानंतर सुहैलने ठरवलं की आता मागे हटायचं नाही.
स्वस्त ऑनलाइन क्लास आणि जिद्द
खिशात पैसे नसताना सुहैलने 'PhysicsWallah' च्या अगदी ३ ते ४ हजार रुपये फी असलेल्या ऑनलाइन 'यकीन बॅच'मध्ये प्रवेश घेतला. पहिल्या प्रयत्नात त्याला ३६९ मार्क्स मिळाले. पण त्याने हार मानली नाही, तो लढत राहिला.
जेव्हा खचून गेला, तेव्हा सरांनी स्वतःची रूम दिली!
एक वेळ अशी आली होती की सुहैलला वाटलं आता आपल्याने हे होणार नाही, तो तयारी सोडणार होता. पण त्याच वेळी मेरठच्या 'PW विद्यापीठ'ने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुहैलला मोफत प्रवेश आणि मार्गदर्शन दिलं. घरात अभ्यासाला शांतता नव्हती, तेव्हा सुहैलच्या एका शिक्षकाने (हाशिर सर) त्याला चक्क स्वतःची रूम अभ्यासासाठी दिली. या मदतीमुळे सुहैलला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आलं.
भावाने शिक्षणावर पाणी सोडलं!
सुहैलच्या या यशात त्याच्या मोठ्या भावाचाही मोठा वाटा आहे. सुहैल भावूक होऊन सांगतो की, "माझ्या भावाने बी.कॉम. मध्ये ऍडमिशन घेतलं होतं, पण मला मदत करण्यासाठी त्याने स्वतःचं शिक्षण सोडलं आणि तो कामाला लागला. या सगळ्यांच्या त्यागामुळे मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही. मी कधीच घड्याळ बघून अभ्यास केला नाही, माझं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या टार्गेटवर असायचं."
आता थेट सर्जन व्हायचंय!
जेव्हा रिझल्ट आला आणि सुहैलने पाहिले की त्याला ६०९ गुण (सुमारे ११,००० रँक) मिळाले आहेत, तेव्हा त्याच्या घरात एकच जल्लोष सुरू झाला. ज्या कुटुंबाने कधी डॉक्टर होण्याचं स्वप्नही पाहिलं नव्हतं, तिथे चक्क ढोल वाजत होते! या गुणांवर सुहैलला एका चांगल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची खात्री आहे. त्याला भविष्यात एक चांगला 'सर्जन' व्हायचं आहे.
मोहम्मद सुहैलची ही कथा म्हणजे पैशांअभावी स्वप्नं मारून जगणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक मोठी आशा आहे. मुस्लिम समाजातील या तरुणाने हे दाखवून दिलं आहे की, जर कुटुंबाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची अफाट जिद्द असेल, तर परिस्थितीचे कितीही मोठे डोंगर पार करता येतात. सुहैलचं रिक्षाचं स्टिअरिंग ते स्टेथोस्कोपपर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रत्येकाला ऊर्जा देणारा आहे!
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -