लग्नामुळे माझ्या स्वप्नांना पंख मिळाले म्हणणाऱ्या 'काश्मीरच्या लता मंगेशकर' शाही मुमताज!
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 4 h ago
शाही मुमताज
दानिश अली
अनेक महिलांसाठी लग्न म्हणजे चार भिंती आणि संसाराची जबाबदारी असते. तिथे स्वतःची स्वप्ने अनेकदा मागे पडतात. पण, 'काश्मीरची लता मंगेशकर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाही मुमताज यांची गोष्ट अगदी वेगळी आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाला आणि गायनाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने लग्नानंतरच नवे पंख मिळाले.
'आवाज-द व्हॉइस'चे दानिश अली यांच्याशी बोलताना मुमताज यांनी आपला हा प्रेरणादायी प्रवास उलगडला आहे. सुप्रसिद्ध काश्मिरी गायक राजा बिलाल यांच्याशी लग्न झाल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला सुरुवात केली, असे त्या अभिमानाने सांगतात.
मुमताज यांना लहानपणापासूनच गायनाची प्रचंड आवड होती. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. समाजाकडून आणि स्वतःच्या कुटुंबाकडूनही त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. गायन ही त्यांची जन्मजात आवड होती. ती सोडण्यास नकार दिल्याने स्वतःच्या घरच्यांनीही त्यांच्याशी बोलणे बंद केले होते.
लहानपणीच्या आठवणी सांगताना त्या हसून म्हणतात, "बाथरुममध्ये अंघोळ करताना हातात पाण्याचा ग्लास घेऊन तोच माईक समजून मी गाणी गायची. बाहेर कोण ऐकतंय याची मला अजिबात पर्वा नसायची." शाळेत असताना त्यांच्या आवाजाचे कौतुक करून मित्र-मैत्रिणी त्यांना बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला द्यायचे. पण मुमताज यांच्यासाठी गायन ही त्यांची साधना होती.
प्रसिद्ध काश्मिरी सुफी आणि शास्त्रीय गायक राजा बिलाल यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. आज ही जोडी काश्मीरमधील सर्वात लोकप्रिय कलाकार जोडी मानली जाते. लग्नानंतर आपण एकटे नसून आपली एक भक्कम 'टीम' आहे, याची जाणीव त्यांना झाली. राजा बिलाल हे त्यांचे पती तर आहेतच शिवाय ते त्यांचे सर्वात मोठे समर्थक आणि गुरुदेखील आहेत.
मुमताज अत्यंत भावूक होऊन सांगतात, "एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला गायन सोडून द्यावे लागणार होते. पण बिलाल साहेबांनी मला समजावले. माझे गाणे थेट हृदयातून येते आणि त्यामुळे ते कोणतेही पाप नाही, असा विश्वास त्यांनी मला दिला."
पतीच्या या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांना मोठी हिंमत मिळाली आणि त्यांनी हा लढा एकट्याने नव्हे, तर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. आज या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. ही मुले त्यांची सर्वात मोठी फॅन आहेत. मुमताज जोपर्यंत अंगाईगीत गात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या मुलांना झोपच लागत नाही.
मुमताज यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण 'ऑल इंडिया रेडिओ, श्रीनगर'चे दिग्गज गायक गुलाम नबी शेख यांच्यामुळे आला. त्यांनी मुमताज यांच्यातील टॅलेंट ओळखून त्यांना 'काश्मीरची लता मंगेशकर' ही मानाची पदवी दिली. एवढ्या मोठ्या कलाकाराने आपली तुलना साक्षात लतादीदींशी करणे, हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याचे मुमताज आवर्जून सांगतात.
अलीकडेच त्यांचे 'मौझ लग्यो अडकलयो..' हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. या सुमधुर गाण्यामुळे तरुणांमध्येही पारंपरिक काश्मिरी संगीताबद्दलची आवड पुन्हा निर्माण झाली आहे. एकेकाळी ज्या लोकांनी त्यांच्या गायनाला विरोध केला होता, तेच लोक आता त्यांच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. हे सांगताना त्यांना मोठे समाधान वाटते.
एकमेकांच्या खंबीर साथीने, हिमतीने आणि जिद्दीने सुरू झालेला हा प्रवास असाच यशस्वीपणे सुरू आहे. शाही मुमताज आणि राजा बिलाल सध्या अनेक नवीन सांगीतिक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम करत असून, काश्मीरच्या संगीत विश्वात आपले मोलाचे योगदान देत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -