भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची चर्चा; कैरो परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांचे संबोधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
कैरोमधील डिप्लोमॅटिक क्लब येथे भारत-इजिप्त ब्रिक्स भागीदारी परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन उपस्थितांना मार्गदर्शन करताना.
कैरोमधील डिप्लोमॅटिक क्लब येथे भारत-इजिप्त ब्रिक्स भागीदारी परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन उपस्थितांना मार्गदर्शन करताना.

 

कैरो 

भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) सचिव (कॉन्स्युलर, पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवासी भारतीय व्यवहार) श्रीप्रिया रंगनाथन यांनी इजिप्तमधील कैरो येथे आयोजित भारत-इजिप्त ब्रिक्स भागीदारी परिषदेत सहभाग घेतला. भारतीय राजनैतिक दूतावास आणि इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कैरोच्या डिप्लोमॅटिक क्लब येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलताना सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांनी भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदाच्या प्राधान्यांवर प्रकाश टाकला. भारत आणि इजिप्तमधील धोरणात्मक भागीदारीमुळे ब्रिक्स अंतर्गत सहकार्य वाढवण्यासाठी आणि ग्लोबल साऊथच्या (Global South) प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी एक मजबूत पाया तयार होतो, असे त्यांनी नमूद केले. या दौऱ्यात त्या इजिप्त, पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या दौऱ्यावर असून १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत.

द्विपक्षीय संबंध आणि ग्लोबल साऊथचा आवाज

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारताचे या देशांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करणे आणि क्षेत्रीय घडामोडींवर चर्चा करणे हा आहे. "ब्रिक्स: ग्लोबल साऊथसाठी एक मजबूत आवाज" या विषयावर सचिव रंगनाथन मुख्य भाषण देणार आहेत. या माध्यमातून ब्रिक्स अंतर्गत भारत-इजिप्त भागीदारी अधिक मजबूत करण्याचे मार्ग शोधले जात आहेत.

सध्याच्या पदावर आल्यानंतर सचिव रंगनाथन यांची ही पहिलीच पश्चिम आशियाई देशांची भेट असून, यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळणार आहे. यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली येथे भारत-युएई संयुक्त समितीच्या ७ व्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले होते, ज्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला होता.



Latest News