Jammu Kashmir Encounter: बुडगाममध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश; लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मुसा चकमकीत ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 36 m ago
लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मुसा चकमकीत ठार
लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मुसा चकमकीत ठार

 

श्रीनगर 

मध्य काश्मीरमधील बुडगाम जिल्ह्याचलगतच्या दुर्गम भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) या प्रतिबंधित संघटनेचा एक कुख्यात आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मंगळवारी चकमकीत मारला गेला. राष्ट्र्रीय रायफल्स आणि सुरक्षा दलांनी ही धडक कारवाई केली आहे.

युसमर्ग भागात सुरक्षा दलांची कारवाई

काश्मीरस्थित चिनार कॉर्पने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी मध्य काश्मीरमधील युसमर्ग परिसरातील कोरग भागात संयुक्त मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर जवानांनी आव्हान दिले असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

मारला गेलेला दहशतवादी सुलेमान शाह ऊर्फ 'मुसा' असल्याची ओळख पटली आहे. पीर पंजाल पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही वर्षांत झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. या महिन्याच्या सुरुवातीला युसमर्गच्या डोंगराळ भागात झालेल्या चकमकीतून तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता, तर ५ सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईत त्याचा जवळचा साथीदार यासिर मारला गेला होता. मुसाचा खात्मा हा जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबासाठी मोठा धक्का मानला जात असून परिसरात सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.