उत्तर ओडिशातील पूरस्थिती अद्याप गंभीर; ५ लाख लोक बाधित, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
ओडिशा पूर संकट
ओडिशा पूर संकट

 

भुवनेश्वर 

उत्तर ओडिशातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर असून यामुळे सुमारे ५ लाख लोक बाधित झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन 'डिप्रेसन'मध्ये बदलल्यामुळे हवामान विभागाने (IMD) १८ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मोहन चरण माथी हे आज सर्वात जास्त प्रभावित झालेल्या भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांचा प्रत्यक्ष दौरा करणार आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राज्य सरकारने पूरग्रस्त भागातून २ लाख ३७ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून, नदीच्या काठावर आणि शाळांमध्ये जवळपास ३०० मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. खराब हवामानामुळे राज्यातील शाळा आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत, तसेच कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी

हवामान विभागाने बालासोर, केओंझार आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा 'रेड वार्निंग' जारी केला आहे. तसेच इतर ११ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि काही जिल्ह्यांसाठी 'येलो वार्निंग' देण्यात आली आहे. उत्तर ओडिशातील संवेदनशील भागांमध्ये सुमारे १०० बचाव पथके तैनात करण्यात आली असून, पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याची माहिती मुख्य सचिव अनु गर्ग यांनी दिली.