१४ वर्षे भाडेकरू असलेल्या अनाथ जुबेरचे काका शेळकेंनी केले अंत्यसंस्कार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 58 m ago
जुबेर शेख
जुबेर शेख

 

अहिल्यानगरमधील सावेडी येथील गणेश चौक परिसर. याच भागातील काका शेळके यांच्या घरात शेख जुबेर मुसा १४ वर्षांपासून भाड्याने राहत होता. जन्मदात्या आई-वडिलांचा चेहराही ज्याला आठवत नव्हता, ज्याचे संपूर्ण बालपण जुन्नरच्या बालगृहात गेले, असा जुबेर १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्या पायावर उभा राहण्यासाठी बाहेर पडला होता.

चौदा वर्षे तो शेळके यांच्या घरी राहिला. सुरुवातीला भाडेकरू असलेला जुबेर कधी शेळके कुटुंबाचा एक भाग बनला, हे त्यालाही कळले नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू, त्याचा संघर्ष अन् त्याचा एकटेपणा काका शेळके जवळून पाहत होते. अशातच काही दिवसांपूर्वी छातीत अचानक तीव्र वेदना झाल्यामुळे जुबेरला मॅक्स केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.

शवविच्छेदनानंतर सर्वात कठीण अन् वेदनादायी प्रश्न समोर आला तो म्हणजे मृतदेह ताब्यात कोण घेणार? नातेवाईक कुणीच नव्हते. त्यामुळे जुबेरचा मृतदेह बेवारस मानून महानगरपालिकेमार्फत अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली. ही बातमी काका शेळके यांच्या कानावर पडली अन् त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

“अखेरच्या प्रवासात बेवारस म्हणून शिक्का बसू देणार नाही”
काका शेळके यांनी एका क्षणाचाही विचार न करता पुढाकार घेतला. रक्ताचे नाते नसले तरी १४ वर्षे डोळ्यांसमोर राहिलेल्या मुलाला असे बेवारस सोडून देणे त्यांच्या संवेदनशील मनाला पटले नाही.

त्यांच्या मनातून उमटलेली ही हाक प्रत्येकाचे डोळे पाणावणारी होती, "जुबेर जन्माला आला तेव्हा अनाथ होता. त्याने अर्धे आयुष्य बालगृहात काढले. पण मृत्यूनंतरही त्याच्यावर बेवारस असा शिक्का बसू देणार नाही. रक्ताचे नाते नसले तरी तो चौदा वर्षे आमच्या डोळ्यांसमोर जगला आहे. त्याचा अखेरचा निरोप त्याच्या धर्मानुसार आणि पूर्ण सन्मानानेच झाला पाहिजे."

अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करणे त्याच्या धर्मपरंपरेनुसार योग्य ठरणार नव्हते. त्यामुळे जुबेरवर इस्लाम धर्मरीतीनुसार दफनविधी व्हावा, यासाठी काका शेळके यांनी सकाळी साडेसहा वाजता शाकीर शेख यांच्याशी संपर्क साधला.

माणुसकीचे हात अन् मित्रांची साथ
शाकीर शेख यांनी तातडीने बेलदार गल्लीतील राजूभाई जागीरदार पाडवाले यांच्याशी संपर्क साधला. एका अनाथ तरुणाला त्याच्या धर्मानुसार सन्मानाने निरोप मिळावा, ही विनंती त्यांनी केली. त्यानंतर अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंगकडून जुबेरच्या अंत्यविधीसाठी कफन उपलब्ध करून देण्यात आले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. कफन, नमाज-ए-जनाजा अन् त्यानंतर मुस्लिम कब्रस्तानमध्ये अत्यंत सन्मानाने त्याचा दफनविधी पार पडला. या संपूर्ण प्रवासात जुन्नर बालगृहातील जुबेरचे लहानपणीचे सोबती पुढे आले. त्यामध्ये संतोष गोपीनाथ घाटविसावे, संदीप प्रकाश वासकर, सतीश रामराव चव्हाण आणि जनार्दन सतीश रॉय यांचा समावेश होता.

एकाच ताटात जेवलेले, एकाच छताखाली वाढलेले हे मित्र जुबेरचा कुटुंब बनून उभे राहिले. जुबेरच्या कबरीवर माती टाकताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. ते अश्रू जुबेरने जगलेल्या आयुष्यभराच्या संघर्षाचे अन् एकटेपणाचे होते. काका शेळके यांनी वडिलांची भूमिका निभावली, तर मित्रांनी भावांची उणीव भासू दिली नाही.

ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या ही घटना आजच्या द्वेषयुक्त वातावरणात माणुसकीचा दिवा तेवत ठेवणारी साक्ष आहेत. काका शेळके, शाकीर शेख, राजूभाई जागीरदार, यतीमखान्याचे सर्व पदाधिकारी अन् जुबेरच्या मित्रांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजाला एक नवी दिशा देणारी ठरेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter