नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने २०२० च्या उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीमागील 'मोठ्या कटाच्या' (larger conspiracy) UAPA प्रकरणात कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना मोठा धक्का देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती दिनेश भट्टी यांच्या खंडपीठाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या तिसऱ्या जामीन याचिका फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ जानेवारीच्या आदेशात बदल केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने नमूद केले की, सुरक्षित साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण झाल्यानंतर किंवा आदेश पारित झाल्यानंतर एक वर्षाची मुदत संपल्यानंतरच ते पुन्हा जामीन मागू शकतात.
फेब्रुवारी २०२० मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधातील आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणाचा तपास केला असून, खालिद आणि इमाम यांच्यावर या दंगलीचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.