गफारुद्दीन मेवातींच्या कार्याला पद्मश्रीची मोहोर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
गफारुद्दीन मेवाती जोगी
गफारुद्दीन मेवाती जोगी

 

गफारुद्दीन मेवाती जोगी हे बालपणापासूनच गावोगावी फिरून लोककलेचे सादरीकरण करणारे नाव आता देशासाठी एक परिचयाचे बनले आहे. अलिकडेच त्यांना मानाच्या 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेवात-ब्रज प्रदेशातील मौखिक आणि सांगीतिक परंपरा जपण्यासोबतच, ते आपल्या कलेच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि सामाजिक सलोख्याचा मोठा संदेश देत आहेत.

'एका हातात गीता आणि हृदयात कुराण'

"आम्ही हातात गीता आणि हृदयात कुराण ठेवू, जो परस्परांमध्ये प्रेम वाढवेल तोच धर्म आणि ईमान ठेवू. भाईचाऱ्याचा शंख वाजवून शांततेची अजान देऊ... आणि या सर्वांच्या आधी आपला हिंदुस्थान ठेवू," या ओळी गुणगुणत गफारुद्दीन आपला जीवनमंत्र स्पष्ट करतात. १९६२ मध्ये जन्मलेले गफारुद्दीन हे 'भपंग' वाजवण्यात पारंगत आहेत. भपंग हे भगवान शंकराच्या डमरूसारखे दिसणारे एकतारी वाद्य आहे. या वाद्याच्या साथीने ते महाभारत (पांडवांचे कडे - सुमारे २,५०० दोहे), लोक रामायण, भगवान शिव विवाह आणि श्रीकृष्ण लीला यांसारख्या दुर्मिळ मौखिक कथांचे गायन करतात.

लोककलेचा वारसा आणि पुढील पिढीसाठी प्रयत्न

राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील कैथवाडा गावात जन्मलेले आणि आता अलवरमध्ये राहणारे गफारुद्दीन हे पारंपरिक मेवाती जोगी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. सातव्या पिढीतील हे कलाकार 'गुरु-शिष्य' परंपरेतून घडले आहेत. बालपणी वडिलांसोबत गावोगावी फिरून कलेचे सादरीकरण करणाऱ्या गफारुद्दीन यांनी आता देशाच्या कानाकोपऱ्यात आपली कला पोहोचवली आहे.

"मी लोककलेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे," असे गफारुद्दीन अभिमानाने सांगतात. सध्या ते राजस्थानमध्ये ३५ विद्यार्थ्यांना याचे धडे देत आहेत. भविष्यात एक निवासी शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या दुर्मिळ कलेचे जतन करू शकतील आणि हा वारसा पुढे नेऊ शकतील. गफारुद्दीन यांचा मुलगा शाहरुख खान मेवाती याने भारत सरकारकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेवात भागातील एखाद्या कलाकाराला अनेक वर्षांनंतर अशी मोठी ओळख मिळाली असल्याचे तो म्हणाला.

मनोरंजनापलीकडची समाजसेवा

गफारुद्दीन यांचा कलाप्रवास केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. ते आपल्या सादरीकरणातून स्वच्छता, आरोग्य यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करतात आणि विशेषतः हिंदू-मुस्लिम एकतेचा प्रचार करतात. २०२२ मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. राजस्थानी आणि हरियाणवी भाषेचा प्रभाव असलेल्या त्यांच्या मौखिक परंपरेतून भारतातील सामायिक संस्कृतीचे आणि बंधुभावाचे दर्शन घडते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter