अवघ्या ११ व्या वर्षी अतिका मीरने आंतरराष्ट्रीय रेसिंग ट्रॅकवर फडकवला तिरंगा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
अतिका मीर
अतिका मीर

 

भारताची अव्वल ११ वर्षीय महिला रेसर अतिका मीर हिने आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 'चॅम्पियन्स ऑफ द फ्युचर अकॅडमी प्रोग्राम'च्या दुसऱ्या फेरीत तिने पात्रता फेरी, हिट रेसेस आणि फायनल अशा सर्वच टप्प्यांवर निर्भेळ यश (क्लीन स्वीप) मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. 

'फॉर्मुला १ अकॅडमी'चा पाठिंबा मिळवणारी अतिका ही पहिली भारतीय रेसर आहे. तिने १२ ते १४ वयोगटातील 'ओक्के-एनजे' (OK-NJ) श्रेणीत अत्यंत आव्हानात्मक वातावरणात हा नवा विक्रम प्रस्थापित केला. या श्रेणीतील तिच्या पहिल्याच हंगामात तिने तिच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि प्रामुख्याने पुरुष चालकांना ट्रॅकवर जोरदार टक्कर दिली आहे.

पात्रता फेरी असो, हीट रेस असो किंवा दोन्ही फायनल असो, अतिका संपूर्ण आठवड्यात इतर सर्व रेसर्सच्या तुलनेत खूप पुढे होती. या उत्कृष्ट कामगिरीसह ती या मालिकेच्या इतिहासात पात्रता, हीट आणि फायनल या तिन्हीमध्ये क्लीन स्वीप करणारी तिसरी ड्रायव्हर ठरली आहे. रेसिंग ट्रॅकवर संपूर्ण वेळ अत्यंत संयम आणि शांतपणे गाडी चालवणाऱ्या या चिमुरडीला पोडियमवर अव्वल स्थानी उभे राहून राष्ट्रगीत ऐकताना मात्र आपले अश्रू अनावर झाले. 

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीनंतर फॉर्म्युला १ मध्ये स्थान मिळवणारी पहिली महिला ड्रायव्हर बनणे हे अतिकाचे मुख्य ध्येय आहे. सर्व २५ चालकांना सारखेच साहित्य आणि सुविधा मिळालेल्या असतानाही तिने अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावरील ड्रायव्हरपेक्षा २.६ सेकंदांपेक्षा जास्त वेळेची मोठी आघाडी घेत विजय मिळवला.

पात्रता फेरीपासून अंतिम शर्यतीपर्यंत एकहाती वर्चस्व
अतिकाचा जन्म मुंबईत झाला असून तिची कौटुंबिक पाळेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. तिने पात्रता फेरीत ५६.७७ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवून पोल पोझिशन पटकावली होती. हे अंतर दुसऱ्या क्रमांकावरील ड्रायव्हरपेक्षा जवळपास तीन दशांश सेकंद कमी होते. तिच्या या कामगिरीने तिच्या वयाच्या आणि अनुभवाच्या पलीकडचे कौशल्य दाखवून दिले. पहिल्या हीट रेसमध्ये अतिकाने सुरुवातीपासून शेवटापर्यंत शर्यतीवर पूर्ण नियंत्रण ठेवले. दुसऱ्या हीट रेसमध्येही तिने आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याला एका सेकंदापेक्षा जास्त वेळेने मागे टाकत फायनलसाठी 'पी१' (P1) ग्रीड पोझिशन मिळवली.

अत्यंत कठीण अशा १५ लॅप्सच्या फायनल शर्यतीत अतिकाने सुरुवातीलाच ताबा मिळवला आणि अवघ्या आठ लॅप्समध्ये ३.९ सेकंदांची मोठी आघाडी घेतली. हा तिच्या रेसिंग कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना होता. या यशानंतर बोलताना अतिका म्हणाली की, हा अत्यंत कठीण आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा ट्रॅक होता, तरीही मी सर्व शर्यती जिंकण्यात यशस्वी ठरले. जेव्हा राष्ट्रगीत वाजवले गेले तेव्हा मी खूप भावूक झाले होते, माझ्यासाठी यापेक्षा चांगला आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वडिलांचा सार्थ अभिमान
या शर्यतीच्या एक दिवस आधी अतिकाला गाडीच्या सेटअपमधील काही समस्यांमुळे पात्रता फेरीत चौथे स्थान मिळाले होते. मात्र, तरीही तिने दोन हीट रेसमध्ये अनुक्रमे दुसरे आणि पहिले स्थान पटकावले होते. अतिकाचे वडील आसिफ मीर हे स्वतः माजी 'फॉर्मुला आशिया' उपविजेते आहेत. आपल्या मुलीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.

आसिफ मीर म्हणाले की, संपूर्ण आठवड्यातील तिचा वेग, आक्रमकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन पाहून मला आश्चर्य वाटले. पहिल्या दिवशी अंतिम फेरीतील अपघातामुळे ती खूप नाराज झाली होती. मला वाटते की, त्याच गोष्टीने तिला इतकी उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.