अतीका मीर या अत्यंत प्रतिभावान रेसरने यशाचे आणखी एक शिखर गाठले आहे. मुळची श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील असलेल्या आणि दुबईत वाढलेल्या या ११ वर्षीय मुलीने इटलीत एक नवा इतिहास रचला आहे.
'वर्ल्ड सिरीज कार्टिंग'मध्ये (WSK) तिने आपल्या गटातील पहिल्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या भारतीयाने मिळवलेले हे आजवरचे सर्वात मोठे यश आहे.
अतीका ही 'फॉर्म्युला १ अकादमी'च्या 'डिस्कव्हर युवर ड्राईव्ह' या विशेष उपक्रमाचा पाठिंबा मिळवणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला ठरली आहे. ती 'ओकेएनजे' (१२ ते १४ वर्षे वयोगट) श्रेणीत 'एफआयए' (FIA) आंतरराष्ट्रीय कार्ट रँकिंगमध्ये जगभरातील महिलांमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
तिने इटलीतील साऊथ गार्डा कार्टिंग ट्रॅकवर 'WSK युरो सिरीज राऊंड २' च्या पहिल्याच शर्यतीत भन्नाट वेग दाखवला. या स्पर्धेत 'ओकेएनजे' श्रेणीमध्ये एखाद्या महिला रेसरने दुसरा क्रमांक पटकावण्याची ही इतिहासातील केवळ दुसरीच वेळ आहे.
अतीका युरोपियन सर्किटवर आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी २०२४ मध्ये फ्रान्समधील 'ले मान्स' (Le Mans) सर्किटवर शर्यत जिंकणारी ती पहिली महिला रेसर ठरली होती.
या आठवड्याच्या शेवटी लोनाटोमध्ये तिची शर्यत पाहण्यासाठी काही खास पाहुणे उपस्थित होते. मर्सिडीज एफ १ चे बॉस टोटो वोल्फ आणि त्यांचा स्टार ड्रायव्हर जॉर्ज रसेल यांनी प्रेक्षकांमध्ये बसून तिचा खेळ पाहिला.

अतीकाने सुरुवातीपासूनच आपला उत्तम फॉर्म दाखवून दिला. वॉर्मअपमध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला. पात्रता फेरीत ती पहिल्या स्थानाची प्रबळ दावेदार होती. पण 'स्लिपस्ट्रीम'चा फायदा तिला घेता आला नाही. असे असूनही ती आपल्या गटात चौथी सर्वात वेगवान रेसर ठरली. ती पहिल्या स्थानावर असलेल्या रेसरपेक्षा केवळ एका दशांश (०.१) सेकंदाने मागे होती.
अतीकाच्या या संपूर्ण आठवड्यातील सर्वात मोठी कामगिरी पहिली शर्यत ठरली. यात तिने दुसरा क्रमांक पटकावला. जगातील सर्वोत्तम ड्रायव्हर्सशी स्पर्धा करताना तिने उत्तम कसब आणि अफाट वेग दाखवला. पहिल्या स्थानापासून ती केवळ ०.८ सेकंदांनी मागे राहिली.
उरलेल्या दिवसांत मात्र अतीकाच्या शर्यतींमध्ये अनेक अडचणी आल्या. काही अटीतटीच्या शर्यतींमुळे तिला 'नोजकोन' पेनल्टी लागली. उपांत्यपूर्व आणि अंतिम शर्यती अत्यंत कठीण होत्या. अखेरीस या शर्यतीची सांगता तिने ६० ड्रायव्हर्समध्ये १५ व्या स्थानावर राहून केली.
आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना अतीकाने अनुभव शेअर केला. "माझ्यासाठी हा आठवडा एक मोठा टर्निंग पॉईंट होता. मी पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली आणि दुसरा क्रमांकही मिळवला. काही अपघातांमुळे माझा हा अत्यंत यशस्वी ठरू शकणारा आठवडा थोडा खराब झाला. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात," असे ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली, "या आठवड्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. आता मी दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शर्यतीची तयारी करणार आहे." चॅम्पियनशिप ऑफ द फ्युचर युरो सिरीज आणि 'एफआयए' युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ती आता सहभागी होणार आहे.
अतीकाचे वडील असिफ नझीर मीर हे भारताचे माजी राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन आणि 'फॉर्म्युला आशिया' उपविजेते आहेत. या आठवड्यात अनेक अनपेक्षित घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. पण अशा परिस्थितीतही आपल्या मुलीने सर्वोत्तम कामगिरी केल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
"पात्रता फेरी आणि पहिल्या शर्यतीतील चांगल्या कामगिरीमुळे अतीकाची सुरुवात अत्यंत दमदार झाली होती. त्यानंतरच्या सर्व शर्यतींमध्ये तिला बाहेरच्या रांगेतून सुरुवात करावी लागली. शर्यत खूपच अटीतटीची होती आणि कोणतीही चूक नसताना तिला पेनल्टी मिळाली. पण रेसिंगमध्ये असे घडतेच," असे ते म्हणाले.
तिची प्रगती खूप वेगाने होत आहे आणि तिला अधिक चांगली ड्रायव्हर बनवण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेत राहू, असा विश्वास त्यांनी अत्यंत अभिमानाने व्यक्त केला. मुलांची मक्तेदारी असलेल्या या खेळात काश्मीरच्या या चिमुकलीने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील मुलींसाठी एक मोठा आदर्श उभा केला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter