नागपूरमधील RSS च्या कार्यक्रमात बोलताना उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि सरसंघचालक मोहन भागवत
प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्याचे जाहीर कौतुक केले आहे. १०० वर्षे जुनी असलेली ही संस्था प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत नेहमीच समाज आणि देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, असे बिर्ला यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित संघाच्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरातील स्वयंसेवकांना संबोधित करताना कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, अनेक आव्हानांच्या काळातही संघाने नेहमीच समाज आणि राष्ट्राला साथ दिली आहे. माझ्या मते, हीच संघाची खरी आणि शाश्वत ताकद आहे. सेवा ही नेहमी एका उद्दिष्टाने प्रेरित होऊन वाढली पाहिजे. राष्ट्र उभारणी आणि चरित्र निर्माण ही आयुष्यभराची वचनबद्धता आहे जी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले.
बदलती जागतिक समीकरणे
आपल्या भाषणात बिर्ला यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीवर आणि अर्थव्यवस्थेवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सध्याचा काळ हा जरी आव्हानांनी भरलेला असला तरी ही भारताची वेळ आहे, म्हणजेच हे भारताचे सुवर्णयुग आहे. आज संपूर्ण जग महासत्तांच्या आपापसातील महत्त्वाकांक्षांच्या लढाईत अडकले आहे. जागतिक स्तरावर सातत्याने बदल होत आहेत. भारतासमोरील मुख्य आव्हान हे आहे की, हा जागतिक बदल अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आपल्या 'अमृत काळात' प्रवेश करत आहे.
इतिहास आपल्याला सर्वात मोठा धडा हाच शिकवतो की, आपण राष्ट्रीय क्षमता आणि राष्ट्रीय लवचिकता निर्माण करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे बिर्ला यांनी नमूद केले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्रांती
कुमार मंगलम बिर्ला यांनी तंत्रज्ञानातील बदलांवर भाष्य करताना सांगितले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आता आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. ही एआय क्रांती संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बदलून टाकणार आहे. अलीकडच्या काळातील इतर कोणत्याही तांत्रिक शोधापेक्षा या एआय क्रांतीचा प्रभाव जगातील सर्वाधिक लोकांवर पडणार आहे, असे सांगत त्यांनी देशातील तरुणांना आणि स्वयंसेवकांना या नव्या आव्हानांसाठी आणि बदलांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.