एस. मेनन
आजच्या काळात जिथे सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती सोशल मीडिया आणि छोट्या विधानांच्या माध्यमातून ओळखल्या जातात, तिथे भारताच्या पहिल्या मुस्लिम आयएफएस अधिकारी नगमा मोहम्मद मलीक यांची उपस्थिती आणि काम अगदी शांत व पडद्याआड राहणारे आहे.
त्यांचा आवाज आणि काम केवळ अशा कॉन्फरन्स रूमपुरते मर्यादित आहे, जिथे जगासोबतच्या भारताच्या भविष्यातील संबंधांना आकार दिला जातो. या ठिकाणी भारत आपली बाजू मांडतो, जी संपूर्ण जगाला भारताच्या प्रामाणिकपणाची आणि हेतूंची खात्री पटवून देते.
मलीक सध्या जपान आणि मार्शल आयलंड्समध्ये भारताच्या राजदूत म्हणून कार्यरत आहेत. इतर अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनीही जाहीर प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवले असून त्यांचे पूर्ण लक्ष केवळ राजनैतिक कर्तव्यांवर केंद्रित आहे.
वर्ष १९९१ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी असलेल्या मलीक मूळच्या केरळच्या आहेत. केरळ हे राज्य आयएएस किंवा भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसाठी फारसे ओळखले जात नाही. या राज्याशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे स्थानिक प्रादेशिक माध्यमांमध्ये अनेकदा मोठे कौतुक केले जाते. परंतु मलीक यांना मात्र अशी वागणूक मिळालेली नाही.
परदेशी राजनैतिक अधिकारी बनण्याचा त्यांचा हा प्रवास त्यांच्या जन्माच्या खूप आधीपासूनच सुरू झाला होता. कारण त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे त्यांच्या पूर्वजांनी समाजात आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी नेहमीच चौकटीबाहेर जाऊन काम केले होते. त्यांचे आजोबा पुथियापुरा अहमद हे सन १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला कासारगोडमधून वकिली करणारे पहिले मुस्लिम वकील होते. तर त्यांचे काका मोहम्मद हाशीम हे सन १९६२ च्या भारत-चीन युद्धातील शहीद आहेत.
मलीक स्वतः दिल्लीत वाढल्या. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्या विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या कारकिर्दीने त्यांना वेगवेगळ्या खंडांमध्ये फिरवले आहे. जपानमधील सध्याच्या भूमिकेपूर्वी आणि रिपब्लिक ऑफ मार्शल आयलंड्समधील सह-जबाबदारीपूर्वी त्यांनी ट्यूनिशिया, पोलंड आणि ब्रुनेई येथे भारताच्या दूत म्हणून काम केले आहे.
त्यांचा हा दांडगा अनुभव त्यांच्या प्रत्येक भाषणातील शांत आणि संयमी सुरातून स्पष्टपणे दिसून येतो. उदाहरणार्थ, ट्यूनिशियाने नवीन संविधान स्वीकारल्यानंतर तिथे बोलताना त्यांनी तिथल्या संघर्षाचे आणि लोकशाहीच्या विजयाचे कौतुक केले होते. तसेच भारताकडून विविध प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, भारत ही एक जुनी लोकशाही असू शकते परंतु भारताला अजूनही ट्यूनिशियाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
"ट्यूनिशियाने आधीच जगाला दाखवून दिले आहे की चर्चेच्या आणि तडजोडीच्या माध्यमातून मोठे राजकीय मतभेद आणि विचारसरणीतील फरक कसे सोडवायचे. मला पूर्ण खात्री आहे की, येथील राजकीय आणि सामाजिक दऱ्या सांधण्यासाठी हीच भावना कायम राहील. आमच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ट्यूनिशिया दौऱ्यातील एका विधानाने मी माझ्या भाषणाचा शेवट करू इच्छिते, प्रौढ लोकशाहीला तरुण लोकशाहीकडून खूप काही शिकण्यासारखे असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ट्यूनिशिया, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तुमचा हात धरत आहोत आणि तुमच्याकडून शिकतही आहोत."
ट्यूनिशिया आणि इतर देशांमधील त्यांच्या आधीच्या कार्यकाळातील अनेक भाषणांमध्ये महात्मा गांधी आणि अहिंसेचा उल्लेख आढळतो. त्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला इतिहासाचे बंद पान म्हणून पाहत नाहीत. तर अहिंसेच्या मलमपट्टीची गरज असलेल्या जगासाठी तो एक जिवंत नैतिक संदर्भ बिंदू आहे, अशा पद्धतीने त्या भारताची बाजू मांडतात.
आपल्या एका भाषणात त्यांनी अहिंसक प्रतिकार कशा प्रकारे सर्वात शक्तिशाली साम्राज्यांना आव्हान देऊ शकतो, यावर प्रकाश टाकला होता. मलीक या भाषणांच्या औपचारिक स्वरूपानंतरही अतिशय सुबक पद्धतीने महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडतात. गांधींनी महिलांना घराबाहेर कसे काढले आणि लवकरच त्या गांधीवादी अहिंसक आंदोलनाचा भाग म्हणून दारूच्या दुकानांवर कशा निदर्शने करू लागल्या व परदेशी वस्तूंची होळी कशी करू लागल्या, याबद्दल त्या बोलतात.
त्यामुळे त्यांच्या मते महिला या केवळ इतिहासाचा भाग बनत नव्हत्या, तर त्या काळातील अत्यंत कर्मठ समाजात सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनत होत्या.
त्यांचे प्रत्येक भाषण परदेशातील श्रोत्यांसमोर भारताची भूमिका मांडणारे असते. अशा प्रकारे त्या भारताची प्रतिमा भूतकाळातील गांधींनी दर्शवलेल्या अहिंसा आणि संवादाच्या आदर्शांमध्ये गुंफतात.
गांधींचा संदर्भ देत त्या म्हणतात, "त्यांनी त्यांच्यावर कडू टीका करणाऱ्यांना आणि शत्रूंना मनापासून माफ केले होते. त्यांच्याबद्दल केवळ आदर आणि कौतुक व्यक्त केले होते. त्यांच्याच प्रेरणादायी शब्दांत सांगायचे तर, जर आपल्याला लोकशाहीची खरी भावना जोपासायची असेल, तर आपण असहिष्णू होऊन चालणार नाही. असहिष्णुता ही स्वतःच्या हेतूबद्दलच्या विश्वासाचा अभाव दर्शवते."
तथापि, जपानमधील त्यांच्या सध्याच्या उच्च पदस्थ भूमिकेत त्यांचा आवाज आता केवळ भूतकाळाला साद घालत नाही तर भविष्याकडे निर्देश करतो.
इतिहासाचे दाखले देण्याऐवजी त्या सध्याच्या काळाची गरज काय आहे यावर अचूक बोट ठेवतात. राष्ट्रीय उत्सव असोत, वैज्ञानिक सहकार्य असो किंवा द्विपक्षीय बैठका असोत, त्यांच्या अलीकडच्या सर्व उपक्रमांचा भर तंत्रज्ञान, नवसंशोधन आणि आर्थिक भागीदारी यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत-जपान संबंध मजबूत करण्यावर आहे.
हा बदल कदाचित देशाच्या बदलेल्या मानसिकतेचा निदर्शक आहे. जो देश पूर्वी स्वतःला भूतकाळाच्या संदर्भात परिभाषित करत होता, तोच देश आता स्वतःच्या लोकांसाठी भविष्य घडवण्यात आणि आपल्या अवतीभवतीच्या देशांवर प्रभाव टाकण्यात व्यस्त आहे. मलीक यांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्यांची विवेकबुद्धी, सूक्ष्मता आणि त्यांची शांत उपस्थिती.
त्यांच्या कोणत्याही मोठ्या मुलाखती उपलब्ध नाहीत, टीव्हीवर वादविवाद नाहीत किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सहज उपलब्ध माहिती नाही. त्याऐवजी त्यांची कारकिर्दी ही केवळ अधिकृत भाषणे आणि राजनैतिक नोट्सच्या माध्यमातून समोर येते. माध्यमांचा सुळसुळाट असलेल्या आजच्या जगात हा एक विरोधाभास निर्माण करतो. एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती जी सर्वसामान्य जनतेसाठी मात्र बऱ्याच अंशी अदृश्य राहिली आहे. तथापि, ही शांत राहण्याची पद्धत या कठीण काळात एका राजनैतिक वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेला अगदी साजेशी आहे.
त्यांचे काम जनमानसाच्या नजरेपासून दूर असलेल्या ठिकाणी चालते. त्यांच्या या कामाचा परिणाम भारत जगातील इतर देशांशी सध्याच्या आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारचे संबंध ठेवतो, यातूनच दिसून येईल. आजच्या काळात ही एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका आहे, जिथे भूराजकीय तणावामुळे जग विखुरले जात असताना प्रत्येक देशाला अत्यंत काळजीपूर्वक आणि जपून पावले टाकावी लागत आहेत.