डॉ. जहिदा सिद्धिकी : ६ वर्षांपासून डायलिसीसवर असूनही अध्यापनाचे कर्तव्य बजावणारी योद्धा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
डॉ. झाहिदा सिद्धिकी
डॉ. झाहिदा सिद्धिकी

 

शाह ताज खान

मुंबईच्या शैक्षणिक वर्तुळात डॉ. जहिदा इक्बाल सिद्धिकी यांना सर्वजण अत्यंत आपुलकीने जहिदा आपा म्हणून ओळखतात. त्या गेल्या ६ वर्षांपासून डायलिसीसवर आहेत. आठवड्यातून दोनदा डायलिसीसची अत्यंत वेदनादायी प्रक्रिया पूर्ण करावी लागत असूनही त्या शाळेत कधीच गैरहजर राहत नाहीत. अत्यंत निष्ठेने आणि समर्पणाने त्या आपले अध्यापनाचे कर्तव्य बजावत आहेत. दीर्घ आणि गंभीर आजाराचा सामना करत असतानाही शिक्षण, उर्दू भाषा व साहित्य आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण याप्रती असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेत किंचितही घट झालेली नाही. 

एका महिलेच्या पोलादी निश्चयाने सर्वांसमोर उभा केलेला हा धैर्य, सहनशीलता आणि जिद्दीचा एक अत्यंत प्रेरणादायी आदर्श आहे. अनेक लोक किरकोळ अडचणीतही इतरांची सहानुभूती शोधत असतात, अशा काळात झाहिदा आपा मात्र आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी ताकदीचा आणि आधाराचा मोठा स्रोत बनल्या आहेत.

डॉ. जहिदा इक्बाल सिद्धिकी या बांद्रा येथील अंजुमन-इ-इस्लाम डॉ. मोहम्मद इशहाक जमखानावाला गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या क्विझ टाईम मुंबईच्या संस्थापक आणि निमंत्रक आहेत. उर्दू माध्यमाच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी या व्यासपीठावरून गेल्या २७ वर्षांपासून आधुनिक शैलीतील सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. आजपर्यंत अशा तब्बल ३०० स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
 

उर्दू शाळांसाठीच्या धमाल – जनरल नॉलेज क्विझ कॉम्पिटिशन या सर्वात मोठ्या शैक्षणिक सोहळ्याच्या २६ व्या वार्षिक आवृत्तीची नुकतीच घोषणा झाली आहे. याव्यतिरिक्त, ९ व्या वार्षिक उर्दू की मोहब्बत में गौरव सोहळ्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उर्दू भाषेच्या प्रसारासाठी शांतपणे आणि निस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या व्यक्तींचा अतिराफिया अवॉर्ड आणि मोहिब-ए-उर्दू अवॉर्ड देऊन गौरव केला जातो.

एवढेच नाही, तर डॉ. जहिदा इक्बाल सिद्धिकी या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्या कवी-शिक्षकांसाठी टीचर्स मुशायराचे आयोजनही करतात.

जहिदा आपा यांनी सांगितले की, 'क्विझ टाईम मुंबई'च्या विविध उपक्रमांमध्ये 'सर्च फॉर न्यू रायटर्स' (नवीन लेखकांचा शोध) या एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. शालेय स्तरापासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये सर्जनात्मक लेखनाची आवड आणि कौशल्य आहे, त्यांना प्रोत्साहन देणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि घडवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

आपल्या अनुभवांना उजाळा देताना त्या म्हणाल्या की, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या नेहमी बैठका आयोजित करतात. पालकांनी आपल्याकडे येण्याची वाट न पाहता त्या स्वतः रहिवासी इमारतींच्या पार्किंगच्या जागांमध्ये किंवा सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रमांचे आयोजन करतात. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत योग्य ते मार्गदर्शन सहज उपलब्ध होते.
 

नियमित डायलिसीस सुरू असूनही त्यांच्या निवासस्थानी भरणाऱ्या साहित्यिक मैफिली आणि पाहुणचारात कोणतीही कमतरता आलेली नाही. नामवंत लेखक आणि कवी या बैठकांमध्ये नियमितपणे सहभागी होतात. झाहिदा आपा यांच्या घरी दर दोन महिन्यांनी होणाऱ्या या साहित्यिक बैठकांचा उच्च दर्जा आणि अप्रतिम नियोजन पाहून आलेला प्रत्येक जण त्यांचे भरभरून कौतुक करतो.

जहिदा इक्बाल सिद्धिकी या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवतात. आठवीच्या वर्गात असलेली मुले बालपणाकडून पौगंडावस्थेकडे झुकत असतात. अशा नाजूक टप्प्यावर त्यांच्यातील शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदल समजून घेणे, शिस्त राखणे आणि त्याच वेळी त्यांचे मित्र व मार्गदर्शक बनणे हे सोपे नसून अत्यंत कठीण काम असते.

संवादादरम्यान झाहिदा आपा म्हणाल्या, "माझ्या विद्यार्थ्यांसाठी मदत किंवा मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती आणि सामाजिक वातावरण चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यांना व्यावहारिक मदत करता यावी, यासाठी मी त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात राहते. मुलांबद्दल पालकांकडे तक्रारी करण्याऐवजी, मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल असे मार्ग शोधण्यासाठी मी पालकांसोबत मिळून काम करण्याचा प्रयत्न करते."

गरजू विद्यार्थ्यांच्या शाळेची फी, गणवेश, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याची सोय झाहिदा आपा स्वतःच्या पुढाकाराने करतात. त्याच वेळी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी त्या प्रोत्साहित करतात.
 

जहिदा आपा गेल्या ६ वर्षांपासून डायलिसीसवर आहेत. दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांना या प्रक्रियेतून जावे लागते. तरीही त्या शाळेत कधीही गैरहजर राहत नाहीत आणि वेळेवर आपले अध्यापनाचे काम पूर्ण करतात.

वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त त्या शाळेच्या सायन्स क्लब आणि नेचर क्लबच्या उपक्रमांमध्ये अत्यंत सक्रिय असतात. साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही त्या तितक्याच उत्साहाने आणि समर्पणाने भाग घेतात.

अनेकदा त्यांच्या गळ्यात डायलिसीससाठी कायमस्वरूपी कॅथेटर घातलेला असायचा. तरीही त्यांनी शिकवणे, शैक्षणिक व साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणे आणि मार्गदर्शनासाठी येणाऱ्या लोकांना भेटणे कधीही थांबवले नाही. आजारपण किंवा वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्या कामात किंवा इतरांप्रती असलेल्या समर्पणात कधीही खंड पडला नाही.

विशेष उल्लेखाची बाब म्हणजे, १८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या 'जनरल नॉलेज क्विझ कॉम्पिटिशन'च्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची दुसरी शस्त्रक्रिया होणार होती. शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेण्याऐवजी त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांचा उत्साह, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठा पाहून काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

काही काळापूर्वी त्यांच्या गळ्यात डायलिसीससाठी लावलेला तात्पुरता कॅथेटर काढण्यात आला, जो सलग ४ महिने वापरला जात होता. या प्रक्रियेनंतर पूर्ववत त्यांच्या फिस्टुलाद्वारे पुन्हा डायलिसीस सुरू झाले आहे.

डॉ. जहिदा इक्बाल सिद्धिकी यांना "अल्लामा सीमाब अकबराबादी यांच्या विद्वत्तापूर्ण आणि साहित्यिक योगदानाचा संशोधनात्मक व चिकित्सक अभ्यास" या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे.

त्यांचे 'मुझे सीमाब कहते हैं' हे पुस्तक सध्या प्रकाशनाच्या टप्प्यात असून लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. त्यांची लेखणी अजूनही अत्यंत सक्रिय असून साहित्य आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून सतत प्रसिद्ध होत असतात.

शिक्षण, समाजकल्याण आणि उर्दू साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. जहिदा इक्बाल सिद्धिकी यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवले गेले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि विशेष पुरस्कार, याशिवाय मजरूह सुलतानपुरी पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार आणि इतर अनेक महत्त्वाच्या बहुमानांचा समावेश आहे.

खरी ताकद शरीरात नसून मनाच्या निश्चयात आणि ध्येयात असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे झाहिदा आपा यांचे आयुष्य होय. त्यांच्या शारीरिक अशक्तपणाने त्यांच्या उच्च ध्येयाच्या वाटेत कधीही अडथळा आणला नाही. मनापासून इच्छा असेल तर आजारपणाला शरीरापुरतेच मर्यादित ठेवता येते, त्याला जिद्द किंवा कर्तव्याच्या आड येऊ देता येत नाही, हेच त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास दाखवून देतो. त्यांचा हाच बुलंद उत्साह आणि प्रेरणादायी कटिबद्धता येत्या अनेक वर्षांपर्यंत अशीच तेवत राहो, हीच प्रार्थना आणि अपेक्षा आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter