पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात आणि दमण दौरा; २२,००0 कोटींच्या विकास प्रकल्पांची देणार भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर येत असून या दरम्यान ते सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभूत कामांचे भूमीपूजन करणार आहेत. या दौऱ्यात ते सुरत येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार असून औद्योगिक प्रगतीला गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांची भेट देणार आहेत.

"लोकांचे जीवनमान उंचावणे आणि 'ईज ऑफ लिव्हिंग' (Ease of Living) सुधारण्याच्या उद्देशाने मी आज ५ जून रोजी सुरत, गुजरात आणि दमणमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. या दोन कार्यक्रमांमध्ये २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभूत सुविधांची पायाभरणी केली जाईल," अशी माहिती पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली.

सुरत आणि दमणसाठी महत्त्वाचे प्रकल्प
अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान सुरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देऊन चालू असलेल्या औद्योगिक कामकाज आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर ते सुरतमध्ये सुमारे १८,८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करतील आणि जाहीर सभेला संबोधित करतील. यामध्ये सुरत येथील २०० खाटांच्या ईएसआयसी (ESIC) रुग्णालयाचे उद्घाटन समाविष्ट आहे.

यानंतर पंतप्रधान मोदी दमणला भेट देणार असून तिथे सुमारे २,९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले जाईल. दमणमध्ये नमो (NAMO) विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होणार आहे, ज्यामुळे या भागातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारेल. यासोबतच आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी 'नमो हॉस्पिटल' जनतेला समर्पित केले जाईल. पर्यटनाला चालना देणे, गुंतवणूक वाढवणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट (NIFT) कॅम्पसची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते केली जाईल.

एक्सप्रेसवे आणि लक्षद्वीपसाठी नवी भेट
पंतप्रधान या दौऱ्यात वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या पॅकेज ६ आणि ७ चे उद्घाटन करणार आहेत. हा महामार्ग गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील हाय-स्पीड वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यासोबतच, पंतप्रधान मोदी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपसाठी सुमारे ८८५ कोटी रुपयांच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीद्वारे (Virtual) पायाभरणी करणार आहेत. यामध्ये कल्पेनी बेट आणि कादमत बेट या दोन्ही बेटांच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना बंदर सुविधांचा विकास करणे समाविष्ट आहे, ज्यामुळे या सागरी क्षेत्रातील व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळेल.