डॉ. अब्दुल कदीर यांच्या कार्याला फोर्ब्सची पावती!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
डॉ. अब्दुल कदीर
डॉ. अब्दुल कदीर

 

मलिक असगर हाशमी 

देशाच्या राजकारणात महिला आरक्षण विधेयक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका यांच्यातील तणावाच्या बातम्यांची चर्चा असतानाच, एक सुखद बातमी समोर आली. ही बातमी वरवर साधी वाटली तरी तिचे परिणाम खूप खोलवर जाणारे आहेत. ही गोष्ट आहे शिक्षण, अपार मेहनत आणि निमूटपणे घडवलेल्या बदलाची. फोर्ब्स इंडियाने २०२६ मधील लीडर्स ऑफ टुमारोच्या यादीत डॉ. अब्दुल कदीर यांचा समावेश केला आहे. हा केवळ एक सन्मान नाही, तर बदल हा बंद खोल्यांमध्ये नाही तर वर्गावर्गांतून घडतो, या विचाराचा विजय आहे.

ही बातमी विशेषतः त्या लोकांसाठी महत्त्वाची आहे, जे प्रसिद्धीचा कोणताही गाजावाजा न करता समाजात काम करत आहेत. त्यातही शिक्षण क्षेत्रात मुलांचे भविष्य घडवण्यासाठी जे अहोरात्र कष्ट घेतात, पण चर्चेत येत नाहीत, अशा लोकांसाठी ही नवी उमेद आहे.

कर्नाटकातील बीदर येथून सुरू झालेली शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सची ही मोहीम आज एका मोठ्या जाळ्यात विस्तारली आहे. १९८९ मध्ये एका छोट्या पावलाने सुरू झालेल्या या उपक्रमाचे आज १०० हून अधिक संस्थांमध्ये रूपांतर झाले आहे. आज ४५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. हा आकडा केवळ संख्या सांगत नाही, तर ज्या स्वप्नांना योग्य दिशा मिळाली आहे, अशा मुलांची ही मोजणी आहे.

अब्दुल कदीर यांचा प्रवास अगदी सामान्य पार्श्वभूमीतून सुरू झाला, पण त्यांचा दृष्टिकोन मात्र असामान्य आहे. त्यांनी नेहमीच शिक्षणाला बदलाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. विशेषतः अशा मुलांसाठी जे समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत, ज्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे आणि जे व्यवस्थेच्या बाहेर फेकले जातात.

त्यांच्या संस्थेचे एक आगळेवेगळे मॉडेल आहे, त्याचे नाव आहे एआयसीयू (AICU) म्हणजेच एकेडमिक इंटेन्सिव्ह केअर युनिट. ही संकल्पना अशा मुलांसाठी आहे ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे किंवा जे अभ्यासात अपयशी ठरले आहेत. अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न येथे केला जातो. हे काम वाटतं तितकं सोपं नसलं, तरी याचे निकाल मात्र नवी आशा निर्माण करणारे आहेत.

अब्दुल कदीर यांचे लक्ष केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही. ते शिक्षणाला जीवनाशी जोडतात. आधुनिक शिक्षण आणि नैतिक मूल्यांचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. याच विचारातून त्यांनी असा अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्यामध्ये विज्ञानासोबतच उत्तम संस्कारांचीही जोड आहे.

मदरशांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडणे, हा त्यांचा आणखी एक मोठा उपक्रम आहे. शिक्षणाची व्याप्ती मर्यादित असता कामा नये आणि प्रत्येक मुलाला, तो कोणत्याही पार्श्वभूमीचा असला तरी त्याला बरोबरीची संधी मिळाली पाहिजे, असे ते वारंवार सांगतात.

जे मुले आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, त्यांनाही उत्तम शिक्षण मिळावे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे ते म्हणतात. जे विद्यार्थी अपयशी ठरले आहेत, त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा तयार केले जाते. याच कारणामुळे त्यांच्या संस्थेत वैद्यकीय शिक्षणावर विशेष भर दिला जातो.

शाहीन ग्रुपने वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांत अनेक विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे. कित्येक विद्यार्थ्यांनी देशातील मोठ्या संस्थांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. हे यश केवळ एका संस्थेचे नसून पालकांनी आपल्या मुलांवर ठेवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे.

मुलींच्या शिक्षणावरही अब्दुल कदीर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यांचे असे मानणे आहे की, जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब प्रगती करते. म्हणूनच त्यांच्या संस्थेत मुलींना आत्मनिर्भर बनवण्यावर जास्त भर दिला जातो.

फोर्ब्सच्या या यादीत तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य, अध्यात्म आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश आहे. मात्र, अब्दुल कदीर यांचे नाव या यादीत असणे हे शिक्षण क्षेत्र आता नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे लक्षण आहे.

सोशल मीडियावरही या बातमीबद्दल खूप प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक लोकांनी याला प्रेरणादायी म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही एक नवी आशा असल्याचे काहींनी सांगितले. एका युजरने लिहिले की, 'शाहीन अकॅडमीने आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांचे भविष्य घेऊन येथे येतात आणि हा विश्वास तुटता कामा नये.' ही प्रतिक्रिया केवळ एक टिप्पणी नाही, तर अब्दुल कदीर यांच्यासारख्या लोकांवर असलेली मोठी जबाबदारी आहे.

अब्दुल कदीर हे केवळ शिक्षणतज्ज्ञ नाहीत, तर ते एक सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांनी अनेक सामाजिक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवणे, जनजागृती मोहिमा राबवणे आणि कौशल्य विकासावर त्यांनी मोठे काम केले आहे.

समाजाचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक वर्गाला बरोबरीची संधी मिळेल आणि हे शिक्षणाद्वारेच साध्य होऊ शकते, असे ते मानतात. म्हणूनच त्यांची ही धडपड केवळ वर्गापुरती मर्यादित राहत नाही.

आज जेव्हा देशात शिक्षणावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, अशा वेळी अब्दुल कदीर यांचे हे मॉडेल एक आदर्श उदाहरण ठरू शकते. संसाधने मर्यादित असतानाही सकारात्मक बदल घडवता येतो, हे या मॉडेलने सिद्ध केले आहे. त्यासाठी गरज आहे ती फक्त योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची.

फोर्ब्सचा हा सन्मान म्हणजे केवळ एक सुरुवात आहे. यामुळे अशा लोकांना ओळख मिळते जे आतापर्यंत पडद्यामागे राहून काम करत होते. समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या तरुणांनाही यातून प्रेरणा मिळते. बदल घडवण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची गरज नसते, तर एक छोटे पाऊलही मोठा परिणाम घडवू शकते, हे अब्दुल कदीर यांचा प्रवास आपल्याला शिकवतो. मात्र त्यासाठी तुमची नियत साफ आणि दिशा योग्य हवी.

आज जेव्हा ही बातमी समोर आली आहे, तेव्हा ती केवळ एका व्यक्तीची उपलब्धी राहिलेली नाही. हे शिक्षणाच्या ताकदीचे प्रमाण आहे. हा पुस्तकांवर आणि वर्गांवर असलेल्या त्या विश्वासाचा विजय आहे. येणाऱ्या काळात या सन्मानानंतर त्यांची ही मोहीम कोणत्या दिशेला जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की, त्यांची ही यशोगाथा आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यातून कदाचित नवे अब्दुल कदीर तयार होतील.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter